अशोकराव जाधवांना ‘स्वीकृत’ नगरसेवक करा; मलठणकरांची एकमुखी मागणी


प्रभाग ७ मधील जनतेचा सूर; लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकरांच्या निष्ठावान शिलेदाराला पालिकेत संधी देण्याची मागणी.

स्थैर्य, फलटण, दि. 27 डिसेंबर : फलटण नगरपरिषदेची नुकतीच पार पडलेली निवडणूक अनेक अर्थांनी गाजली. मात्र, संपूर्ण शहराचे आणि तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग क्रमांक ७ च्या लढतीची चर्चा अद्यापही थांबलेली नाही. या प्रभागात विजयी उमेदवारापेक्षा पराभूत झालेले उमेदवार आणि लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक अशोकराव जाधव यांचीच चर्चा सर्वाधिक होत आहे. त्यांचा पराभव झाला असला, तरी जनमानसात त्यांचे स्थान आजही अबाधित असून, त्यांना ‘स्वीकृत सदस्य’ म्हणून पालिकेत घेण्यात यावे, अशी एकमुखी मागणी मलठणच्या जनतेने भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाकडे केली आहे.

पराभवाची चर्चा आणि लोकभावना

प्रभाग क्रमांक ७ ची लढत अत्यंत चुरशीची झाली. या लढतीकडे संपूर्ण फलटणचे लक्ष होते. निकालानंतर अशोकराव जाधव यांचा पराभव झाला, तरीही त्यांच्या कामाची पद्धत आणि जनसंपर्क यामुळे “हरूनही जिंकलेला बाजीगर” अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या अशोकरावांची उणीव पालिकेत भासू नये, ही सर्वसामान्य मलठणकरांची भावना झाली आहे.

निष्ठावंत आणि कार्यसम्राट

अशोकराव जाधव हे लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या तालमीत तयार झालेले जुने आणि जाणते कार्यकर्ते आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावान सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पालिकेत सध्या भाजपची सत्ता आली असताना, मलठणच्या विकासासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी लढणारा अशोकराव जाधव यांच्यासारखा अभ्यासू चेहरा पालिकेत असणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पार्लमेंटरी बोर्डाकडे मागणी

“आमचा नगरसेवक हा केवळ पदापुरता नाही, तर सेवेसाठी आहे. आजवर त्यांनी मलठणच्या जनतेसाठी अहोरात्र कष्ट घेतले आहेत. आता सत्ता आली असताना, आमच्या हक्काचा माणूस सभागृहात असावा,” या भावनेतून मलठणमधील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिलांनी अशोकराव जाधव यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी द्यावी, अशी आग्रही मागणी पार्लमेंटरी बोर्डापुढे केली आहे.


Back to top button
Don`t copy text!