
दैनिक स्थैर्य । दि.२२ मार्च २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यात असणाऱ्या वेणेखोल कातवडी रस्ता हा उरमोडी धरणाच्या रिंगरोड चा भाग आहे. या रस्त्याच्या एकूण लांबी पैकी बाराशे मीटर रस्ता हा वन विभागाच्या हद्दीतील असून , या रस्त्याच्या निर्मितीवेळी मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची टिका शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी केली आहे.
त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हणले आहे की वनविभागाच्या हद्दीतून रस्ता तयार करताना सर्व नियमांचे सरसकट उल्लंघन करून नियमातील दिलेल्या रुंदी पेक्षा ज्यास्त रुंदीने रस्ता तयार करण्यात आला आहे . वनविभागाच्या मालकीचे हजारो ब्रास गौण खनिज गायब झालं तर आहे . त्याचबरोबर याठिकाणी करण्यात आलेलं काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून , सदर काम करत असताना मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करण्यात आली आहे.
संबधित कनिष्ठ वन कर्मचारी यांनी तक्रार दाखल करून देखील तत्कालीन वनक्षेत्रपाल सातारा वनविभाग यांनी आर्थिक तडजोड करून प्रकरण दाबून ठेवले असल्याचा आरोप सचिन मोहिते यांनी केला आहे. याप्रकरणा मध्ये सहभगी असलेले वन व पाटबंधारे विभागाचे तत्कालीन अधिकारी यांची देखील संपूर्ण विभागीय चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही व्हावी म्हणून उपवनसंरक्षक व अधीक्षक अभियंता यांच्या कडे शिवसेनेच्या वतीने तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून संबंधितांवर तात्काळ कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालणार असल्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे.