
दैनिक स्थैर्य । दि.०४ एप्रिल २०२२ । फलटण । जागतिक तापमान वाढ ही मोठी समस्या आहे. विशेषतः शेती व शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत असून अन्य समाज घटकांनाही आज तापमान वाढीमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने ही बाब गांभीर्याने समजावून घेऊन प्रत्येकाने आपल्या परीने पर्यावरण संतुलनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन महाराष्ट्र विधान परिषद सभापती व सातारा जिल्ह्याचे मार्गदर्शक नेतृत्व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. यावेळी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या विशेषांकाचे दिमाखात प्रकाशन यावेळी करण्यात आले.
महाराष्ट्र विधान परिषद सभापती व फलटण संस्थानचे विद्यमान अधिपती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत उत्साही वातावरणात अनंत मंगल कार्यालयात साजरा करण्यात आला. सातारा, पुणे जिल्ह्यासह राज्याच्या काही भागातून आलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, उद्योजक, कामगार, महिला व तरुण वर्ग आणि शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी वगैरे सर्वच समाजघटकांनी अक्षरशः रांगा लावून त्यांना शुभेच्छा दिल्या.
वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन चळवळीत सर्वांची भक्कम साथ
पर्यावरण संतुलन व तापमान वाढ रोखण्यासाठी अन्य उपाययोजना बरोबरच वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन हे अत्यंत प्रभावी ठरणार असल्याचे नमूद करीत आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना शाल, श्रीफळ, हार, गुच्छ, फुले न आणता वृक्ष रोपे आणावीत असे आवाहन श्रीमंत रामराजे यांनी What’s App व अन्य समाज माध्यमाद्वारे आदल्या दिवशी केले असल्याने काल शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रत्येकाने विविध प्रकारची वृक्ष रोपे देवून श्रीमंत रामराजे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतानाच एकप्रकारे पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या चळवळीत आम्ही आपल्यासोबत सक्रिय असल्याची ग्वाही दिल्याचे दिसून आले.
श्रीमंत रामराजे यांनी दिले सर्वांना धन्यवाद
अनंत मंगल कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी आणलेल्या वड, पिंपळ, लिंब, जांभूळ, चिंच, आंबा यासह अन्य फळ व फुलझाडांच्या रोपांचे अक्षरशः ढीग लागले होते. या सर्व वृक्ष रोपांचे योग्य नियोजन करुन वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, त्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था करण्याची ग्वाही देत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय सहभागी होऊन दिलेल्या शुभेच्छांबद्दल सर्वांना धन्यवाद देत ही चळवळ अखंडित सुरु ठेवण्याचे आवाहन केले.
जलक्रांती, कृषी क्रांती, औद्योगिक क्रांती नंतर आता पर्यावरण संतुलन क्रांती
गेल्या ३० वर्षात जलक्रांती, कृषी क्रांती, औद्योगिक क्रांती द्वारे सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी पट्टयात भूमातेला जल संजीवनी आणि भूमीपुत्रांना दिलासा देण्यात यशस्वी झाल्यानंतर आता पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणाची नवी क्रांती आपल्या अमृतमहोत्सवी वर्षातील पदार्पणाचा मुहूर्त साधून घडवू पाहणारे महाराष्ट्र विधान परिषद सभापती जलनायक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना याकामी सर्व स्तरावरुन लाभत असलेला उदंड प्रतिसाद पहाता ते वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाची चळवळ सातारा जिल्ह्यात निश्चित यशस्वी करतील हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही कारण यापूर्वीच्या जलक्रांती, कृषी क्रांती, औद्योगिक क्रांतीच्या चळवळी त्यांनी यशस्वी करुन संबंधीतांना त्याचा लाभ मिळवून दिल्याचे सर्वश्रुत आहे.
खा. शरदराव पवारांसह मान्यवरांच्या शुभेच्छा
फलटण संस्थानचे २९ वे अधिपती आणि महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरदराव पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री ना. अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, माजी खासदार कल्लाप्पा आण्णा आवाडे, केंद्रीय वाहतूक परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी, बुलढाणा अर्बन बँक चेअरमन राध्येश्यामजी चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, महाराष्ट्राच्या मंत्री मंडळातील अन्य मंत्री गण, खा. श्रीनिवास पाटील, सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री ना. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. श्री. छ. शिवेंद्रसिंह राजे भोसले, आ. मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, आ. दिपकराव चव्हाण, जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे आजी माजी पदाधिकारी, सदस्य, अन्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी, फलटण शहर व तालुक्यातील विविध संस्था, ग्रामपंचायती, विकास सोसायट्या व अन्य संस्थांचे पदाधिकारी, संचालक, सदस्य यांनी समक्ष भेटून आणि दूरध्वनी व अन्य समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शुभेच्छा
जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक विनय गौडा, फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी तथा प्रशासक डॉ. सौ. अमिता गावडे पवार, नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित विविध महाविद्यालये, माध्यमिक विद्यालये, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, मराठी शाळा वगैरे मधील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रा. शिक्षक वगैरेंनी वृक्ष रोपे देवून श्रीमंत रामराजे यांना समक्ष भेटून आणि दूरध्वनी व अन्य समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
सकाळी देवदर्शन झाल्यानंतर भगिनी श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी औक्षण करुन अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त श्रीमंत रामराजे यांना शुभेच्छा देत त्यांना लाभलेले उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि सुख समाधान वृद्धिंगत होवून लोकहिताच्या कामासाठी शक्ती लाभो यासाठी प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना केले.