दैनिक स्थैर्य । दि. १७ जून २०२२ । लोणंद । पालखी सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी निरा स्नान घाट तसेच लोणंद पालखीतळ, पहीले ऊभे रिगंणाचे ठिकाण असलेला चांदोबाचा लिंब तसेच तरडगाव पालखीतळाची पाहणी करून प्रशासनाकडून सोहळयाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांच्यासह फलटणचे आमदार दिपक चव्हाण उपस्थित होते, तसेच जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल, फलटणचे प्रांत शिवाजीराव जगताप तसेच प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालक मंत्र्यांसोबत लोणंदच्या नगराध्यक्षा मधुमती पलंगे- गालिंदे, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके, डाॅक्टर नितीन सावंत, लोणंद नगरपंचायतचे नगरसेवक भरत शेळके , पाडेगाव (खंडाळा) च्या सरपंच अनिता मर्दाने, उपसरपंच रघुनाथ धायगुडे, तसेच पाडेगाव (फलटण)च्या सरपंच स्मिताताई खरात, विजयराव धायगुडे शंकरराव मर्दाने ,संतोष डोईफोडे पाटील, असगर इनामदार , ॲड. गजेंद्र मुसळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री ना.बाळासाहेबज पाटील, फलटणचे आमदार दिपकजी चव्हाण हे नीरा दत्तघाट येथे माऊलींच्या स्नान ठिकाणची व लोणंद येथील पालखीतळाची पाहणी करणेसाठी आले असता हर्षवर्धन शेळके-पाटील, संदीप शेळके-पाटील, नगरसेविका सौ.दीपाली शेळके-पाटील, नगरसेविका सौ.ज्योती डोनीकर, बापूराव धायगुडे यांनी लोणंद शहराला पाणी पुरवठा करणारे पाडेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शहरात चार दिवसाआड पाणी येत असल्याचे सांगत पालखीतळ ते म्हस्कोबा मंदिर ते भिसे वस्ती पर्यंत संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण असल्याचे सांगितले तसेच खेमवती नदीवरील मटण मार्केटच्या पाठीमागील पुलाची दुरावस्था झालेने पुल नव्याने व्हावा व त्याचे रुंदीकरण व बाजूने बंदिस्त पुल करण्यात यावा या मागण्याचे निवेदन पालकमंत्री यांना दिले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाणीप्रश्नाची गंभीर दखल घेत वीज पुरवठ्यासंबंधीत अडचणी अभियंत्यांना सोडवण्यास सांगिले व इतर कामे वाढीव पालखी विकास आराखड्यात समाविष्ट करत असल्याचे सांगितले.