दैनिक स्थैर्य | दि. २६ नोव्हेंबर २०२३ | पुणे |
“भारती विद्यापीठाच्या पूना कॉलेज ऑर्फ फार्मसीच्या तीन विद्यार्थ्यांनी एकत्र येवून ‘स्लिटझर फार्मा’ या व्यवसायास सुरूवात केली आहे; ही बाब अभिनंदनीय आहे. शिवाय हा व्यवसाय सुरू करताना त्यांनी उचललेली पावले अभिमानास्पद आहेत. कोणत्याही व्यवसायाची सुरूवात कठीण असते; परंतु पुढे मार्ग सोयीस्कर होईल. कायमस्वरूपी एकत्र राहून आणि पारदर्शकता सांभाळून व्यवसाय यशस्वी करा”, अशा सदिच्छा भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी व्यक्त केल्या.
जय हांडे, यश परसेवार आणि भारद्वाज बेडकिहाळ या तीन युवकांनी एकत्र येवून सुरू केलेल्या वैद्यकीय उत्पादने आणि उपकरणांची आयात – निर्यात करणार्या ‘स्लीटझर फार्मा’ या कंपनीच्या कॉर्पोरेट ऑफिसचे उद्घाटन कोथरूड डेपो (पुणे) येथे डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे महापालिकेचे माजी महापौर तथा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, एमआयटी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्याम देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, राजकुमार परसेवार, श्यामकुमार हांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. शिवाजीराव कदम पुढे म्हणाले, “फार्मसी क्षेत्राने आपल्या देशाला उच्च स्थानावर नेले आहे. या क्षेत्रात गुणात्मक स्पर्धा असल्याने तुमच्या उत्पादनांच्या गुणवत्तेवर तुमचा व्यवसाय अवलंबून आहे. आज भौतिक सुखाकडे लोक जास्त वळलेले असल्याने हे सुख मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा पहायला मिळत आहे. यातून मनुष्य ताणतणावात राहत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे वैद्यकीय आणि फार्मसी क्षेत्रात काम करण्यासाठी उत्तम दिवस असले तरी त्याच प्रमाणात जोखीम आणि जबाबदारीही मोठी आहे.”
मुरलीधर मोहोळ यांनी ‘स्लिटझर फार्मा’च्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती घेवून “कोणतीही मदत हक्काने मागा. मी सहकार्य करीन”, असे सांगून कंपनीचे सी.ई.ओ. जय हांडे, सी.एफ.ओ. यश परसेवार, सी.ओ.ओ. भारद्वाज बेडकिहाळ यांचे अभिनंदन करून कंपनीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ. मिलींद पांडे म्हणाले, “डॉ.शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या विद्यार्थ्यांनी हा व्यवसाय सुरू करून ‘नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बनले पाहिजे’ या उक्तीची पहिली पायरी पार केली आहे. तुम्हाला तंत्रज्ञानाच्या मदतीने व्यवसायाचा प्रचार आणि प्रसार करावा लागेल. उद्योग – व्यवसाय करताना माईंड टू मार्केट, पेपर टू प्रोडक्ट आणि आयडिया टू इंम्प्लिमेंटेशन या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. उद्योग क्षेत्रात कंपनीचा विश्वास निर्माण करा, तुम्हाला निश्चितपणे यश मिळेल.”
“मराठी मुलं आपल्या कारकीर्दीची सुरुवात व्यवसायापासून करत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. भारतातले फार्मसी क्षेत्र जागतिक पातळीवर उच्च स्थानावर असून या क्षेत्रात भरपूर स्पर्धा आहे. नामांकीत फार्मसी कंपन्यांप्रमाणेच ‘स्लिटझर’चे ही नाव व्हावे. या कंपनीला पुणे महापालिका क्षेत्रात कोणतीही मदत लागल्यास आपण निश्चितपणे सहकार्य करू”, असे श्याम देशपांडे यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या फार्मसी क्षेत्रात डॉ. शिवाजीराव कदम यांचे मोठे काम असल्याने शिवाय डॉ.पतंगराव कदम यांच्या नंतर डॉ. शिवाजीराव कदम यांचा वरदहस्त आमच्या कुटूंबाच्या पाठीशी कायम आहे. त्यामुळे या कंपनीचा शुभारंभ त्यांच्या हस्ते केल्याचे रविंद्र बेडकिहाळ यांनी स्पष्ट केले.
श्यामकुमार हांडे यांनीही मनोगत व्यक्त करुन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारद्वाज बेडकिहाळ यांनी केले. मान्यवरांचे स्वागत यश परसेवार यांनी केले तर आभार जय हांडे यांनी मानले.
कार्यक्रमास वैद्यकीय, शिक्षण, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, बेडकिहाळ, हांडे, परसेवार परिवार यांची उपस्थिती होती.