
स्थैर्य, फलटण, दि. १६ डिसेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार कु. सिद्धाली अनुप शहा यांच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे. सिद्धाली शहा यांच्या प्रचारार्थ सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आणि भाजपच्या नेत्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी आज प्रभागात झंझावाती दौरा करत मतदारांशी थेट संवाद साधला. “कु. सिद्धाली शहा यांच्या रूपाने तुम्हाला एक उमदे आणि सुशिक्षित नेतृत्व लाभले आहे. तुमच्या हक्काची लेक म्हणून तुम्ही तिला प्रचंड मतांनी विजयी करा,” असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले.
ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी कु. सिद्धाली शहा यांच्यासमवेत ‘हाऊस टू हाऊस’ प्रचार मोहीम राबवली. यावेळी प्रभागातील महिला भगिनींशी संवाद साधताना त्यांनी सिद्धाली शहा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. या प्रचार फेरीत उमेदवार सिद्धाली शहा यांच्यासह भाजपच्या अनेक महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मतदारांशी संवाद साधताना ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर म्हणाल्या, “फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांनी या प्रभागात केलेली विकासकामे सर्वश्रुत आहेत. त्यांच्या या समाजसेवेचा आणि कामाचा वारसा पुढे नेण्यासाठीच कु. सिद्धाली शहा या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. प्रभागातील मूलभूत समस्यांची सोडवणूक करणे असो किंवा शासनाच्या विविध योजना तळागळात पोहोचवणे असो, सिद्धाली या कामात कुठेही कमी पडणार नाहीत, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तोच विश्वास मतदारांनीही त्यांच्यावर दाखवावा.”
फलटण शहराच्या भविष्यातील वाटचालीवर भाष्य करताना त्या पुढे म्हणाल्या की, “माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली फलटण शहरात आपल्याला अमूलाग्र बदल घडवायचे आहेत. प्रशासकीय दृष्ट्या फलटणला सर्व सुविधांयुक्त शहर बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे. हा विकास आणखी गतिमान करण्यासाठी आणि शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी फलटण नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता असणे अत्यंत आवश्यक आहे.”
प्रभाग क्रमांक ८ च्या सर्वांगीण विकासासाठी आणि फलटणच्या प्रगतीसाठी भाजपच्या कमळ चिन्हा समोरील बटन दाबून सिद्धाली अनुप शहा यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन शेवटी ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केले. त्यांच्या या दौऱ्यामुळे प्रभागातील भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह दुप्पट झाला असून, महिला मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षणीय ठरत आहे.
