स्थैर्य, फलटण : राजकारण व समाजकारणात सक्रिय झाल्यापासून गेली २५/३० वर्षे फलटण तालुक्यातील सर्वसामान्यांच्या सतत संपर्कात राहुन त्यांच्या प्रश्नांची मांडणी पंचायत समिती, जिल्हा परिषद, फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून शासन / प्रशासनासमोर करताना त्याची सोडवणूक करण्याला प्राधान्य दिले, त्याचप्रमाणे पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष म्हणून या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्याचा उपयोगही सतत लोकांच्या हितासाठी केलेल्या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना महाराष्ट्र विधान परिषदेवर काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपटराव जाधव यांनी केली आहे.
फलटण पंचायत समिती सभापती, सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष व अध्यक्ष म्हणून किंवा सलग २५ वर्षे पंचायत समिती व जिल्हा परिषदेत तालुक्यातील प्रत्येकवेळी वेगळ्या मतदार संघातून मोठया मताधिक्याने विजयी झालेल्या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधानसभा किंवा लोकसभेवर मतदारांनी निश्चित मोठया मताधिक्याने निवडून दिले असते, मात्र इतकी लोकप्रियता लाभलेल्या श्रीमंत संजीवराजे यांनी ती संधी पक्षाकडे कधी मागितली नाही, अन्यथा माढा लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या हातून गेला नसता, आजही ते स्वतः अशी मागणी करण्यास उत्सुक नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदराव पवार, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार काम करणे, ते सोपवतील ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हीच त्यांची भूमिका असल्याचे स्पष्ट करीत आम्हा कार्यकर्त्याना श्रीमंत संजीवराजे तथा बाबा सतेच्या पदावर असावेत त्यामाध्यमातून लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशी अपेक्षा असल्याने आपण, ही मागणी करीत असल्याचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाल्यापासून फलटण तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीपासून ते विधानसभेपर्यंत एक हाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे ठेवण्याचे काम महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष ना. जयंत पाटील, बारामती लोकसभा मतदार संघाच्या खा. सुप्रियाताई सुळे, आ. दीपक चव्हाण, सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर व फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले असल्याचे यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपटराव जाधव यांनी निदर्शनास आणून दिले.
फलटण कोरेगाव विधान सभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने श्रीमंत संजीवराजे यांना विधानसभा मतदार संघामधून निवडून जाता आले नाही. वास्तविक पाहता फलटण तालुक्यासह जिल्ह्यामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला असून त्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुप्रीमो खा. शरद पवार यांनी घेऊन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, शहराध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी केली आहे.
सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचा बालेकिल्ला असून हा बालेकिल्ला उभारण्यात फलटणकरांनी जिल्हावासीयांच्या सहकार्याने पक्षश्रेष्ठीच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची भूमिका बजावली आहे. विधान परिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेत पक्ष वाढीसाठी रात्रंदिवस परिश्रम घेणारे सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना पक्षश्रेष्टींनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करावा अशी अपेक्षा मिलिंद नेवसे, सौ. निताताई नेवसे, दत्तात्रय गुंजवटे व श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपटराव जाधव यांनी केली आहे.
श्रीमंत संजीवराजे यांचे कर्तृत्व व नेतृत्व सर्व जिल्ह्याला माहित असून अशा या कर्तृत्ववान नेतृत्वाला विधान परिषदेवर कामाची संधी दिली तर सातारा जिल्ह्यात पक्षाची अजून चांगली बांधणी होईल. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे संपूर्ण सातारा जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यामध्ये विविध घटकांशी अतिशय चांगले संबंध असून या संबंधांचा फायदा सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला होईल यात कसलीही शंका नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे सुप्रिमो खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी श्रीमंत संजीवराजे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी फलटण सह जिल्ह्याच्या अन्य तालुक्यातूनही होत आहे.