चक्रीवादळांचा मुकाबला करण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करा – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. २०: जागतिक वातावरणात होणारे बदल लक्षात घेता दरवर्षी मान्सूनच्या पूर्वी चक्रीवादळ येण्याची शक्यता गृहीत धरून या वादळाने कमीतकमी नुकसान व्हावे आणि वादळ येऊन गेल्यानंतर वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन आणि कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले आहेत.

‘तोक्ते’ चक्रीवादळ येऊन गेल्यावर वीज यंत्रणांच्या झालेल्या नुकसानीचा आणि मान्सूनपूर्व तयारीचा आढावा दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हीसी) बैठक घेऊन ऊर्जामंत्री यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महावितरणचे संचालक (ऑपरेशन्स) संजय ताकसांडे हे मंत्रालयातून तर महावितरणचे सर्व प्रादेशिक संचालक व मुख्य अभियंता, महापारेषणचे सर्व मुख्य अभियंता हे व्हीसीद्वारे उपस्थित होते.

“गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आले, यावर्षी तोक्ते चक्रीवादळ आले. जागतिक वातावरण बदल आणि इतर भौगोलिक कारणामुळे दरवर्षी असे चक्रीवादळ येण्याची शक्यता गृहीत धरावी लागणार आहे. चक्रीवादळाचा इशारा येईल आणि मग आपण नियोजन करू यापेक्षा आता दरवर्षी मान्सूनच्या तोंडावर चक्रीवादळ येणार हे गृहीत धरून नियोजन करा. वादळामुळे आपले कमीतकमी नुकसान होईल आणि वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करता येईल यासाठी कायमस्वरूपी नियोजन व आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार करा,” असे निर्देश त्यांनी आज बैठकीत दिले.

दरवर्षी पाऊस आल्यावर अनेक ठिकाणी वीज जाते. हे टाळण्यासाठी पावसाळी पूर्व तयारीचा भाग म्हणून पाऊस झाल्यावरही वीज पुरवठा कायम रहावे यासाठी आपत्कालीन योजना तयार करा, अशा सूचना त्यांनी केल्या तसेच एखाद्या ठिकाणी वीज गेल्यास तिथे वीज पुरवठा करण्याचे अन्य पर्याय काय असतील याचाही आराखडा तयार करा, असे डॉ.राऊत म्हणाले.

पालघरमधील वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या आघाडीवर नेमकी काय प्रगती आहे याबद्दल त्यांनी आजच्या बैठकीत विशेष चर्चा केली. अधिकाऱ्यांकडून तेथील कामाच्या सद्यस्थितीची माहिती घेऊन त्यांनी पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनीवर संपर्क साधून ते वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामाबाबत समाधानी आहेत का, याची चौकशी केली. श्री.भुसे यांनी दिलेल्या सूचनांवर कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले. पालघरमध्ये महावितरणकडे झाडे कापण्याची यंत्रे नसल्याच्या तक्रारीवरून त्यांनी अधिकाऱ्यांना जाबही विचारला.

“तोक्ते वादळ व यापूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात महावितरण व महापारेषणच्या सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे. त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो,” अशा शब्दांत त्यांनी सर्वांचे कौतुक केले.

“खंडित झालेला वीज पुरवठा आपण लवकरात लवकर पूर्ववत करतो हे जरी आकडेवारीवरून खरे असले तरी बऱ्याच ठिकाणी फील्डवर वेगळी परिस्थिती असते. याबाबत आमदार, खासदार व इतर माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार आपल्या फील्डवरील अधिकाऱ्यांना फोन व दूरध्वनी करीत असतात, परंतू काही अधिकारी फोनही उचलत नाहीत व दाद देत नाहीत, अशा तक्रारी मला प्राप्त झाल्या आहेत. अशा काही  तक्रारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना देत असून त्यावर चौकशी करून 15 दिवसात अहवाल सादर करावा”, असे निर्देशही त्यांनी दिले.

चक्रीवादळ रोधक यंत्रणा उभारण्यासाठी अभ्यास

राज्यात चक्रीवादळ येऊन वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून चक्रीवादळ रोधक वीज पायाभूत सुविधा कशा उभारता येतील याचा अभ्यास सध्या सुरू आहे. या विषयावर केंद्र सरकारसोबत नियमित चर्चा सुरू असल्याचे ऊर्जा सचिव दिनेश वाघमारे यांनी या बैठकीत सांगितले.

केंद्र सरकारने केले कौतुक

महाराष्ट्र सरकारने चक्रीवादळानंतर ज्या पद्धतीने वेगाने वीज पुरवठा सुरळीत केला त्याचे कौतुक केंद्रीय ऊर्जा सचिवांनी केले आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या बैठकीत दिली. चक्रीवादळग्रस्त जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत स्वतः गेले दोन तीन दिवस नियमित संपर्कात होतो, असेही सिंघल यांनी यावेळेस सांगितले.

महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांनी यावेळेस एक सादरीकरण करून महावितरणने यासाठी काय केले याची माहिती दिली. “या चक्रीवादळाचा मुकाबला करण्यासाठी महावितरण, महापारेषण यांच्यासह मुंबईतील बेस्ट, अदाणी, टाटा यांच्यासारख्या संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेला एक कोअर गट स्थापन करण्यात आला. याशिवाय 24 तास सक्रिय असलेले एक नियंत्रण कक्ष महावितरणच्या मुख्यालयात स्थापन करण्यात आले. ऑक्सिजन प्रकल्प, रुग्णालये यांचा वीज पुरवठा खंडित होऊ नये याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले,” असे ताकसांडे यांनी सांगितले.

 


Back to top button
Don`t copy text!