दैनिक स्थैर्य । दि. १४ मे २०२२ । आटपाडी । आटपाडी गावाला सन १९५३ सालापासून ग्रामपंचायत आहे. मागील अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायत अगर नगरपरिषद मध्ये करण्याच्या हालचाली चालू होत्या, परंतु आटपाडी येथे दिनांक १२ मे २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी घाई गडबडी मध्ये आटपाडी ग्रामपंचायत ची नगर पंचायत घोषित केली त्याप्रमाणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच अधिसूचना निघेल असे त्यांनी सांगितले आहे.
महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायत व नगरपंचायत मध्ये विशेष फरक नसतो, फक्त घरपट्टी पाणीपट्टी वाढते, त्या प्रमाणात विकास कामासाठी आर्थिक निधी मिळत नाही. त्यामुळे आटपाडी ग्रामपंचायतीची नगरपंचायत करून पुन्हा आटपाडी करांची विकास कामाच्या बाबतीत पंचायतच झाली आहे.
नगरपंचायत पेक्षा नगरपरिषदेला विकास कामासाठी शासनामार्फत ज्यादा आर्थिक निधी मिळतो तर नगरपरिषद पेक्षा नगरपालिकेला शासनाकडून ज्यादा आर्थिक निधी मिळत असतो त्यामुळे गावाच्चा विकास कामाला चालना मिळते व गावाचा सर्वांगीण विकास होतो असे असताना आटपाडी ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करणे हा निर्णय चुकीचा वाटत आहे त्यामुळे यावर मंत्रीमहोदयांनी व आमदारांसह इतर नेत्यांनी फेर निर्णय घेणे गरजेचे आहे. आटपाडी गावाचा जर खरोखरच विकास करावयाचा असेल तर नगरपरिषद किंवा नगरपालिका करावी. नगरपालिका किंवा नगरपरिषद करणेकामी जेवढी लोकसंख्या कमी पडते तेवढ्या लोकसंख्येची आटपाडी गावा शेजारील गावे समाविष्ट करून आटपाडी ग्रामपंचायतीची नगर परिषद किंवा नगरपालिका करावी ही आम जनतेची मागणी आहे. त्यामुळे मंत्रीमहोदयांनी व आमदारांनी तसेच इतर नेत्यांनीही फेरविचार करून नगरपंचायतीची केलेली घोषणा तात्काळ रद्द करावी व त्याच दिवशी आटपाडी ग्रामपंचायतीची नगरपालिका किंवा नगरपरिषद होणे विषयी तात्काळ अधिसूचना काढावी जेणेकरून लवकरच आटपाडी गावाचा सर्वांगीण विकास होईल असे आटपाडीकरांचा आम जनतेच्या वतीने आमची मागणी आहे.