
स्थैर्य, फलटण, दि. २ सप्टेंबर : “आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही,” या निर्धाराने मुंबईतील आझाद मैदानावर पाच दिवसांपासून उपोषण करत असलेल्या संघर्षयोद्धे श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठे यश आले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करत शासन निर्णय (जीआर) काढल्यानंतर, आज हे आंदोलन यशस्वीरित्या समाप्त झाले. या निर्णयानंतर, मुंबईत तळ ठोकून असलेल्या फलटण तालुक्यातील हजारो मराठा बांधवांनी गुलालाची उधळण करत प्रचंड जल्लोष साजरा केला.
श्री. मनोज जरांगे पाटील यांनी सोमवार, दि. १ सप्टेंबरपासून पाणीत्याग करण्याचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारवरील दबाव प्रचंड वाढला होता. अखेर, उपसमितीचे अध्यक्ष मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सातारा जिल्ह्याचे मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मंत्री श्री. जयकुमार गोरे यांनी श्री. जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करून मागण्या मान्य केल्या. सातारा गॅझेट आणि औंध संस्थानच्या नोंदींच्या आधारे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा मार्ग मोकळा झाल्याने, हा मराठा समाजाचा मोठा विजय मानला जात आहे.
सरकारच्या निर्णयानंतर आझाद मैदानावर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. फलटणच्या मराठा सेवकांनी एकमेकांना गुलाल लावून आपला आनंद व्यक्त केला.
फलटणमध्ये ‘विजयोत्सव’
आंदोलन यशस्वी करून मुंबईहून परतणाऱ्या सर्व आंदोलकांचे स्वागत करण्यासाठी आणि आरक्षणाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी, बुधवार, दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता फलटण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ‘आरक्षणाचा विजयोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या विजयोत्सवात सर्व मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.