
स्थैर्य, कोळकी, दि. ०६ सप्टेंबर : फलटण शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे दुचाकी चोरीतील दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे. मध्यरात्रीच्या गस्तीदरम्यान विना नंबर प्लेटच्या संशयित दुचाकीचा पाठलाग करून पोलिसांनी ही कारवाई केली.
फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार नितीन सजगणे आणि महिला पोलीस हवालदार पूनम वाघ हे कोळकी परिसरात रात्र गस्त घालत होते. यावेळी त्यांना विना नंबर प्लेट असलेल्या स्पेंडर मोटर सायकलवरून दोन तरुण संशयास्पदरीत्या जाताना दिसले.
पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, त्यांनी दुचाकी भरधाव वेगाने पळवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सुमारे चार किलोमीटरपर्यंत सिनेस्टाईल पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, ही दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. या दुचाकीबाबत वडूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद (CR No.187/2025) असल्याची माहिती समोर आली.
याप्रकरणी पोलिसांनी साहिल आनंद चव्हाण (वय १८, रा. गुरसाळे, ता. खटाव) आणि आदित्य रामदास शिरतोडे (वय १९, रा. ललगुन, ता. खटाव) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर फलटण शहर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा (CR No.292/2025) दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना मुद्देमालासह वडूज पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

