
स्थैर्य, सातारा, दि. २८ ऑगस्ट : सातारा जिल्ह्यात मालमत्तेविरोधात गंभीर गुन्हे करणाऱ्या एका टोळीवर मोठी कारवाई करत, सातारा पोलिसांनी टोळीतील दोन प्रमुख सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. साखळी चोरी, जबरी चोरी, दरोडा यांसारखे गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या या गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ५५ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, टोळी प्रमुख स्वप्नील उर्फ बाळू सुरेश जाधव (वय २४) आणि टोळी सदस्य निखील उर्फ काळू सुरेश जाधव (दोघेही रा. तावडी, ता. फलटण) यांच्यावर शहर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही टोळी सातारा जिल्ह्याला लागून असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, पुरंदर आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातही सक्रिय होती. महिलांच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने हिसकावणे, वाटमारी करणे अशा गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी, शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. हेमंतकुमार शहा यांनी या दोघांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल आर. धस यांच्यामार्फत सादर करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांच्यासमोर या प्रस्तावावर सुनावणी होऊन, या दोघांना सातारा जिल्हा आणि लगतच्या तालुक्यांमधून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश पारित करण्यात आला.
सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर अशा प्रकारची कडक कारवाई यापुढेही सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.