फलटणच्या रविवार पेठेत मोठी घरफोडी; १४.२७ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास


स्थैर्य, फलटण, दि. १ नोव्हेंबर : फलटण शहरातील रविवार पेठेतील शिवशक्ती चौक परिसरात एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे १४ लाख २७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.

ही घटना बुधवारी (दि. २९) ऑक्टोबर रोजी रात्री १ ते सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली.

याबाबत अक्षय जितेंद्र दोशी (वय ३२, रा. शिवशक्ती चौक, रविवार पेठ) यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. दोशी हे त्यांच्या दोन मजली इमारतीत राहतात.

अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या सेफ्टी डोअरचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर, पहिल्या मजल्यावरील बंद बेडरूमचे कुलूप तोडून घरातील मंगळसूत्र, सोन्याचे चोकर, कंगण आणि बांगड्या असे एकूण १४,२७,००७ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

घटनेची माहिती मिळताच फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

याप्रकरणी गुन्हा नोंद क्रमांक ३५२/२०२५ अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!