
दैनिक स्थैर्य । 22 मे 2025। सातारा । सातारा शहराजवळील खिंडीतील गणपती व कुरणेश्वर मंदिर परिसरात आज बुधवारी दि. 21 रोजी दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मंदिराचे व परिसराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. डोंगरावरुन सर्व राडारोडा वाहून आल्यामुळे मंदिर सभागृहात चिखलमाती व पाणी साठले होते. मंदिराच्या पूर्वेकडील भिंतीचा भाग ढासळून मंदिरासमोरील भागात सर्व राडारोडा झाला आहे. तसेच वरील बाजूकडून पार्किंग केलेल्या दोन दुचाकी पाण्याच्या वेगाने वाहून खाली मंदिराजवळील राडारोड्यात अडकल्या.
खिंडीतील गणपती मंदिर सातारकरांचे श्रद्धास्थान आहे. याठिकाणी भाविकांची आणि पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. आजच्या दुपारी झालेल्या पावसाने श्री गणपती मंदिर परिसरात मोठी हानी झाली अजिंक्यतारा किल्ल्याच्या दक्षिण-पश्चिम बाजूच्या मागील बाजूस व सज्जनगडला जाणार्या बोगद्याजवळ हा मंदिर परिसर आहे. मंदिराकडे जाताना पायर्या उतरुन खाली जावे लागते. वरील बाजूस असलेल्या पार्किंगमधील असलेल्या दोन दुचाकी पायर्यांवरून पाण्याबरोबर वाह्न मंदिर परिसरात झालेल्या राडारोड्यात अडकल्या आहेत. प्रचंड मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. कुरणेश्वर मंदिर परिसरातही पाणी साठले आहे. या भागात मोठ्या संख्येने देशी वृक्षांची लागवड केली आहे. परिसरात आलेला राडारोडा व साठलेल्या पाण्यामुळे तसेच संरक्षक भिंतीचे मोठे नुकसान झाले आहे.