विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या कामाला गती द्यावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । राज्यातील विद्यापीठांत शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची त्याच परिसरात राहण्याची सोय व्हावी, यासाठी विद्यापीठांमध्ये विशेष वसतीगृह उभारण्यात येणार आहेत. या वसतिगृहाच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारणीबाबत मंत्रालयात आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास,  उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  श्री. पाटील म्हणाले की, आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी कमीत कमी ५०० क्षमतेचे व जास्तीत जास्त १००० विद्यार्थी क्षमतेचे विद्यापीठांच्या परिसरात वसतीगृह उभारण्यात येणार आहेत. स्थानिक पातळीवरची क्षमता लक्षात घेऊन त्या त्या विद्यापीठांनी तातडीने प्रस्ताव तयार करून आदिवासी विकास विभागाकडे  पाठवावा, असे निर्देश संबंधितांना दिले.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृह उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देणार – आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित

आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग नेहमीच प्रयत्न करीत असतो. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपला जिल्हा सोडून इतर जिल्ह्यात जात असतात. तिथे त्या विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी विद्यापीठाच्या परिसरातच वसतीगृह उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना शैक्षणिक परिसर सोडून जावे लांब राहावे लागणार नाही. विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या वसतीगृहामध्ये विद्यार्थी व  विद्यार्थीनींसाठी  स्वतंत्र वसतीगृह  असेल. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध होईल असेही मंत्री श्री. गावीत यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!