कोयना नदीवरील नेरळे पुलाची मोठी दुरवस्था

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कराड, दि. 27 : गतवर्षीच्या महापुरामुळे मोरणा विभागाला जोडणार्‍या कोयना नदीवरील नेरळे पुलावरील रस्त्यावरचे डांबरीकरण पूर्णपणे वाहून गेल्याने पुलावरील भेगा उघड्यावर पडल्या आहेत. पुलाच्या पिलरमध्ये झाडी उगवली आहेत तर पुलावरील संरक्षण लोखंडी अँगलही पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याने येथे लाकडी मानग्यांचा तात्पुरता आधार देण्यात आल्याने रात्री-अपरात्री एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलाची मोठी दुरवस्था झाली असून गेल्या वर्षभरापासून या पुलाकडे बांधकाम विभागाचे सोईस्कररित्या दुर्लक्ष होत आहे. एखादी घटना घडल्यावरच संबंधित यंत्रणेला जाग येणार का असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

मोरणा विभागात सुमारे 35 ते 40 गावे वसली असून येथील जनता ये-जा करण्यासाठी याच पुलाचा उपयोग करतो. त्यामुळे मोरणा विभागाला जोडणारा कोयना नदीवरील अत्यंत महत्त्वाचा असा हा नेरळे पूल आहे. या पुलावरून मोरणा विभागात दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. अवजड वाहतूकही या पुलावरून सातत्याने होत असते. या विभागात उभ्या राहिलेल्या पवनचक्क्यांची अवजड वाहतूकही या पुलावरून झाली आहे. मात्र सध्या या पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. गेल्या वर्षी महापूर आला. त्या महापुरामुळे या पुलावरील सर्व डांबरीकरण रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे पुलावरील मोठमोठ्या भेगा उघड्यावर पडल्या आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षणार्थ लावण्यात आलेले लोखंडी अँगलही पुराच्या पाण्यातून वाहून गेले आहेत. त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे असताना संबंधित विभागाकडून लाकडी मानगे लावून तात्पुरती सोय करण्यात आली असून तेही इतरत्र पडले आहेत. रात्री-अपरात्रीच्या वेळेला या पुलावरून येता-जाताना अपघात झाल्यास पुलाला संरक्षण अँगल नसल्याने गाडी थेट खोल नदीपात्रात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलावरील वाहतूक पूर्णपणे धोकादायक झाली आहे.

गेल्या एक वर्षापासून या पुलाकडे संबंधित विभागाच्या कोणत्याही अधिकार्‍यांनी लक्ष दिलेले नाही. देवाच्या कृपेने आजपर्यंत येथे कोणतीही घडली नाही आणि यापुढेही घडू नये. मात्र सध्या पावसाळ्याचे दिवस पाहता अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? रस्त्यावरचे डांबरीकरणही पूर्णपणे वाहून गेले आहे. पुलावरून जड वाहतूक चालू असताना धरणीकंप झाल्यासारखा पूल हादरत असतो. तरी देखील बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नाही. या पुला वरून होणार्‍या जड वाहतुकीकडे लक्ष देऊन पुलावरील भेगा व संरक्षणासाठी लावलेले लोखंडी अँगल बसवून पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी केली आहे.हा पूल फार जुना असून पुलावर मोठ्या भेगा असल्याने गाडी जाताना जोरात आवाज येतो. लोखंडी अँगल नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. पुलाची दुरवस्था पाहता लवकरात लवकर पुलाला लोखंडी अँगल बसवावेत व पुलावरील भेगा भरून घ्याव्यात.- कृष्णत मांडावकर, नागरिक

मोरणा विभागात लोकप्रतिनिधी, आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य तसेच गाव पुढार्‍यांची खाणच आहे. निवडणुका आल्या की पांढरे कपडे घालून मिरवण्यातच धन्यता मानतात. या पुला वरून जाताना त्यांना पुलाची दुरवस्था दिसत नाही का? मोरणा विभागाला जोडणारा हा महत्त्वाचा दुवा असलेल्या या पूल दुरुस्तीच्या कामासाठी कधी तरी गट-तट विसरून सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रियाही मोरणा विभागातील सूज्ञ नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!