
स्थैर्य, फलटण, दि. २९ सप्टेंबर : फलटण नगरपरिषदेची निवडणूक काही दिवसांवर आलेली असतानाच, खासदार गटाला एक मोठा धक्का बसला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि नगरपरिषदेचे माजी गटनेते अशोकराव जाधव यांनी आज, सोमवारी पहाटे ५ वाजता एका व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे भाजप व खासदार गटाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे.
जाधव यांनी आज पहाटे ठेवलेल्या स्टेटसमध्ये म्हटले आहे की, “लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांची माफी मागून मी लवकरच भाजप व खासदार गटाचा राजीनामा देत असून, या पुढे कोणत्याही राजकीय पक्षाचे काम करणार नाही.”
या घोषणेमुळे फलटणच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, कालच (रविवार, दि. २८) अशोकराव जाधव यांनी राजे गटावर ‘वापरा व फेका’ अशी घणाघाती टीका करणारे प्रसिद्धीपत्रक जारी केले होते आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला होता.
अशोकराव जाधव हे लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या काळापासून खासदार गटात सक्रिय होते आणि त्यांनी नगरपरिषदेत गटनेता म्हणूनही काम पाहिले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर, अवघ्या काही तासांतच त्यांनी घेतलेली ही १८० अंशातील वेगळी भूमिका आणि ‘लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांची माफी मागून…’ या त्यांच्या शब्दप्रयोगामुळे, राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.