फलटण शहर पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद


स्थैर्य, फलटण, दि. १२ सप्टेंबर : फलटण शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, फलटण शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. निखिल जाधव असे या आरोपीचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे शहरातील जबरी चोरी आणि घरफोडीचे तब्बल सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्याच्या पैशातून खरेदी केलेली ५ लाख रुपये किमतीची पिकअप गाडीही जप्त केली आहे.

फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात वाढत्या चोऱ्यांच्या घटना लक्षात घेता पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनला तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार, ११ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे पथक गस्त घालत असताना, त्यांना एक संशयित पिकअप गाडी जाताना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवली असता, चालक याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, गाडीमध्ये घरफोडीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. अधिक चौकशीत, त्याने १८ ऑगस्ट रोजी शहरातील सहाराशील परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच, त्या चोरीतील मुद्देमाल मुंबई येथे विकून त्या पैशातून ही पिकअप गाडी खरेदी केल्याचेही त्याने सांगितले.

या एका आरोपीच्या अटकेमुळे फलटण शहर पोलीस स्टेशनमधील गु.र.क्र. २३९/२०२५, २०३/२०२५, २१७/२०२५, २४३/२०२५, २९८/२०२५ आणि २९९/२०२५ असे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक दिपक शिंदे, तसेच बापुराव घालूनडे, अतिश घाडगे, निलेश कळबुर्गे, दादासाहेब यादव, पुनम वाघ, राणी फाळके, स्वप्नील खराडे, जितेंद्र ठिके यांचा समावेश होता.


Back to top button
Don`t copy text!