दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑगस्ट २०२२ । मुंबई । समाज प्रबोधनाची परंपरा महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या माध्यमातून हिरीरीने जपली जात असून याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा – सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबरोबरच वैयक्तिकरित्याही नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती गणेशोत्सवाची सुंदर आरास करून यामार्फत सामाजिक संदेश देण्यात येतो. याच धर्तीवर महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती गणेशोत्सव स्पर्धकांना ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या देखावा – सजावट स्पर्धेकरिता छायाचित्र आणि ध्वनीचित्रफित पाठवायची आहे.
सामाजिक संदेशात, 18 वर्षावरील नागरिकाचा मताधिकार कायदेशीर अधिकार, प्रत्येक पात्र नागरिकांने मतदार यादीत नाव नोंदवावे, मताधिकार बजावावा, दुबार नावे वगळण्यासाठी मतदार कार्डाला आधार कार्ड जोडणी करा, हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून सार्वजनिक गणेश मंडळांना देखाव्यातून तर घरगुती गणेशाकरिता अभिनव कल्पनेतून राबविता येईल. मताधिकार बजावताना जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला प्रतिनिधी निवडणे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यासारख्या विषयांवरही देखावा – सजावटीतून जागृती करता येऊ शकते. त्याचबरोबरच, पाणी, सार्वजनिक स्वच्छता, खड्डे – मुक्त रस्ते, चांगले शिक्षण, चांगली घरे अशा अनेक सार्वजनिक सुविधा नागरिकांना विनासायास प्राप्त करून देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असल्याने ती पार पाडणाऱ्या लोकप्रतिनिधींची योग्य निवड करणेही आवश्यक असल्याचा संदेश या देखावे व सजावटीतून व्यक्त झाला पाहिजे.
स्पर्धेची विस्तृत नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https://ceo.maharashtra.gov.in आणि समाजमाध्यमांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत https:/forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7 या गूगल अर्जावरील माहिती भरून आपल्या देखावा – सजावटीचे साहित्य पाठवावयाचे आहे.
या स्पर्धेकरिता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत मतदार ओळखपत्राला आधार कार्डाची जोडणी, मतदार नोंदणी, नाव वगळणे, तपशीलातील दुरूस्त्या, नवीन सुधारणान्वये मतदार नोंदणीसाठी लागू झालेल्या चार अर्हता तारखा यासाठी प्रचार – प्रसार केला जावा आणि अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.