माईंच्या ९ लेकींना मिळाले आयुष्याचे जोडीदार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०४ मे २०२२ । मुंबई । संपूर्ण जगभर अनाथांची माय अशी ओळख असलेल्या पद्मश्री डॉ. स्व. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ९ लेकींना आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत. पुणे जिल्ह्यातील कुंभारवळण येथील ममता बाल सदनमध्ये माईंच्या या लाडक्या ९ लेकींचा आज रविवार दिनांक १ मे २०२२ रोजी थाटात साखरपुडा पार पडला. हयातीत असतानां त्यांनी आपल्या सोन्यासारख्या मानस  कन्यांचे थाटात लग्न पार पडावे असं स्वप्न बघितलं होत आज त्या नाहीयेत मात्र ममता बाल सदनने त्यांचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे.

मुलगी उपवर झाली की आईच्या मनाला तिच्या लग्नाचे वेध लागतात. पुढच्या आयुष्याची वाटचाल करण्यासाठी तिला अनुरूप साथीदाराची गरज आहे हे जाणवतं. तरी त्याचबरोबर एकीकडे मन खूप हळवं बनते. असच काही माईंचं झालं होत. लहानाचं मोठं सांभाळलेल्या आपल्या लेकींना विवाहाच्या बंधनात अडकतांनाचे स्वप्न साकार होत आहे.  हे नियतीला मान्य नसले तरी आज त्यांच्या पश्चात ९ लेकींना आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत. आज रविवारी कुंभारवळण येथील ममता बाल सदनमध्ये  ९ लेकींचा एकसाथ थाटात साखरपुडा पार पडला. परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला होता. संस्थेच्या वतीने विधिवत पूजापाठसह साखरपुडाचे नियोजन करून उपवर मुलाला अंगठी, संपूर्ण पोशाख, श्रीफळ देऊन सोपस्कार पार पाडले.

माईंच्या ९ मानस कन्यांच्या मामांनी उपवर मुलांच्या मामांचे संस्कुतीप्रमाणे कुमकुम तिलक लावून श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी आ. संजय जगताप यांच्या सौभाग्यवती राजवर्धिनी जगताप, माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांची कन्या ममता शिवतारे, पंचायत समिती सदस्य सुनीताताई कोलते, चिंतामणी हॉस्पिटल सासवड येथील डॉ. वांढेकर, डॉ. वाघोलीकर, डॉ. रावळ, कुंभारवळणचे सरपंच अश्विनी खळदकर, माजी सरपंच अमोल कामठे, देविदास कामठे यांच्यासह पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून मुलींना आशीर्वाद दिले.

लेकींच्या साखरपुडा कार्यक्रमाच्या निमित्ताने ममता बाल सदनमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. पत्रिकांच्या जुळणाऱ्या गुणांपेक्षा दोन मनांचं, दोन विचारांचं जुळणं महत्त्वाचं असतं. नात्यांत असणारं प्रेम महत्त्वाचं आहे आणि जिथे प्रेम, सामंजस्य, आपुलकी असते तीच नाती जास्त टिकतात. या सर्व गोष्टी ममता बाल सदनने लक्षात घेऊन आपल्या मुलींना साजेसा होईल अश्याच योग्य उपवर मुलाचा शोध घेतला.  सर्व पाहणी झाल्यानंतर सबंधित उपवराच्या परिवाराला आदराने संस्थेत बोलावून पाहणीचा कार्यक्रम घेतला. बैठकीमध्ये उपवर मुलगा आणि उपवर मुलगी या दोघांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारण्यात आले.

दोघांना हि आपल्या आवडी-निवडी काय आहे याबाबत विचारणा केली. त्यानंतर दोघांची पसंती आहे कि नाही हे लक्षात घेऊन टीळ्याचा कार्यक्रम सुद्धा पार पाडला. सोहळ्याच्या आयोजनाकरिता माई सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र दिपक गायकवाड, कन्या ममता सिंधुताई सपकाळ, विनय सपकाळ, अधीक्षिका स्मिता पानसरे, मनीष जैन, पूजा जैन तसेच ममता बाल सदनचा स्टाफ यांनी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!