स्थैर्य, सातारा, दि १३: सातारा तालुक्यातील भाटमरळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी महिलांना गावचा कारभार करण्याची संधी दिली आहे. सातही जागांवर महिला बिनविरोध झाल्या असून महिला राज असलेल्या या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा कायापालट होईल. गावाच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू, असा शब्द आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विचाराची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या भाटमरळी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. ग्रामस्थांनी सातही जागांवर महिलांना संधी देऊन गावाचा कारभार त्यांच्या हाती दिला आणि एक आदर्श निर्माण केला. सरपंचपदी सौ. निर्मला माणिक चव्हाण तर उपसरपंचपदी सौ. मोनाली भीमराव जाधव यांची निवड झाली. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्य सौ. मीना सुभाष देशमुख, सौ. गौरी सचिन क्षीरसागर, सौ. सुश्मिता राहुल अडागळे, सौ. रिनल गजानन जाधव, सौ. नीलम प्रताप जाधव यांचा आ. शिवेंद्रसिंहराजे आणि सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, गावचा कारभार महिलांच्या हाती देऊन भाटमरळीच्या ग्रामस्थांनी एक आदर्श निर्माण केला आहे. या संधीचा फायदा घेऊन सर्वांनी गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत आणि ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ करावा. गावाच्या विकासासाठी आपण वाट्टेल ते सहकार्य करू असा शब्द त्यांनी यावेळी दिला.