दैनिक स्थैर्य | दि. ५ सप्टेंबर २०२३ | सातारा |
पाटण तालुक्यातील उरूल येथील शेतकरी महेश निकम यांना ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ६ लाखांचे कर्ज उपलब्ध झाले आहे. या मिळालेल्या कर्जामधून त्यांनी चांगल्या पद्धतीने गोठा व २ गायी घेतल्या आहेत. त्यांना महिन्याकाठी २५ ते ३० हजारांचे हमखास उत्पन्न मिळत आहे. त्यांची ही यशोगाथा…
महेश निकम हे पाटण तालुक्यातील उरूल येथील शेतकरी. त्यांना बागायती साडेचार एकर शेती. संपूर्ण क्षेत्रात ऊस उत्पादन करीत आहेत. या उत्पादनातून त्यांना वर्षाला एकदा पैसे मिळत होते. मिळालेले पैस वर्षभर पुरत नसल्याने त्यांना आर्थिक चणचण भासत होती. त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील योजनांची माहिती घेऊन गोठा बांधकामासाठी व गायी विकत घेण्यासाठी कर्जाचा प्रस्ताव मल्हार पेठ येथील शिवदौलत बँकेकडे सादर केला.
बँकेने कागदपत्रांची पडताळणी करून श्री. निकम यांना ६ लाखांचे कर्ज दिले. या कर्जावर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकडून १२ टक्के व्याज परतावा दिला जात आहे. श्री. निकम यांनी ३ लाख रूपये खर्चून सुसज्ज असा गोठा बांधून उर्वरित तीन लाखांच्या २ गायी घेतल्या आहेत. गायी साधरणत: दररोज किमान २५ ते ३० लिटर दूध देत आहेत. हे दूध डेरीला घालत असल्याचे सांगून १५ दिवसाला या डेरीकडून दूधाचे पैसे पेड केले जात आहेत. साधरण खर्च वजा जाता महिन्याला २५ ते ३० हजार रुपयांचा निव्वळ नफा होत असल्याचेही श्री. निकम सांगतात.
गोठ्याची साफसफाई व गायींची देखभाल मी आणि माझी पत्नी करीत आहे. या महामंडळाच्या योजनेमुळे माझी आर्थिक परिस्थिती सुधारली असून जीवनमानातही बदल झाला आहे. महामंडळाकडील योजनांमुळे अनेक मराठा समाजातील तरुण उद्योजक तसेच छोटे-मोठे व्यवसाय सुरू करू शकले आहेत. उपलब्ध नोकर्या पाहता मराठा समाजातील युवक-युवतींनी नोकरीच्या मागे न लागता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकील योजनेचा लाभ घेऊन आपला व्यावसाय सुरू करावा, असेही श्री. निकम आवर्जून सांगतात.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे आत्तापर्यंत ९ हजार ७१५ नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैकी ४ हजार ७१४ लाभार्थ्यांना ४१० कोटींचे कर्ज बँकेमार्फत वितरण करण्यात आले असून यावर महामंडळाकडून ३१ कोटी रुपयांचा व्याजपरतावा देण्यात आला आहे. उद्योग व छोटे व्यवसाय उभारणीसाठी जिल्ह्यातील मराठा समाजातील युवक-युवतींनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाण पुलाजवळ, सातारा या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सन्मवय अधिकारी मयुर घोरपडे यांनी केले आहे.
– वर्षा पाटोळे, जिल्हा माहिती अधिकारी, सातारा