
स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 16 : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. ही माहिती धोनीने इंस्टाग्रामवरून दिली. धोनीने हा व्हिडिओ पोस्ट केल्यावर पहिल्यांदा संभ्रम निर्माण झाला होता. धोनीने खरंच निवृत्ती घेतली की नाही, याबाबत उलगडा होत नव्हता. काही वेळाने अखेर धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीबाबतचा उलगडा झाला. धोनीची निवृत्तीची घोषणा होती न होती तोच सुरेश रैना यानेही आपल्या निवृत्तीची घोषणा करून टाकली.
धोनीने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर असताना कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. धोनीने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 क्रिकेटलाही आता रामराम ठोकला आहे. त्यामुळे धोनी आता भारताच्या जर्सीमध्ये चाहत्यांना दिसणार नाही.
धोनीच्या नेतृत्वखाली भारताने 2007 मध्ये ट्वेन्टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2011 मध्ये धोनी कर्णधार असताना भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडकाला गवसणी घातली होती. धोनीच्या काळात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असे म्हटले जाते. धोनी कर्णधार असताना भारताने सर्वात जास्त सामने जिंकले आहेत. धोनीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाची चांगली बांधणी केली. काही खेळाडूंना घडवण्यामध्ये धोनीचा सिंहाचा वाटा आहे. धोनी सध्या आयपीएलचा विचार करत असेेल, असेच चाहत्यांना वाटत होते पण शनिवारी निवृत्तीचा निर्णय घेत धोनीने सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.
धोनी आयपीएल खेळण्यासाठी चेन्नईला रवाना झाला होता. त्यावेळी त्याच्याबरोबर चेन्नईच्या संघातील खेळाडू होते. धोनी हा फक्त आयपीएलचा विचार करत असेल, असे वाटले होते. कारण आयपीएलच्या कामगिरीवर धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अवलंबून होती. धोनी आधी आयपीएल खेळेल आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय करिअरचा काही दिवसांनी निर्णय घेईल, असे वाटत होते. आयपीएल सुरु होण्यापूर्वी धोनीने निवृत्तीचा निर्णय घेतल्यामुळे या स्पर्धेतील त्याच्या कामगिरीवर सर्वांचीच नजर असेल. धोनी आता यापुढे किती वर्षे आयपीएल खेळणार, याचीही उत्सुकता चाहत्यांना असणार आहे.
धोनीने आतापर्यंत सर्वांनाच धक्के दिले आहेत. निवृत्तीचा निर्णय घेतानाही धोनीने सर्वांना धक्का दिला आहे. धोनी पंधरा ऑगस्टला आपली निवृत्ती जाहीर करेल, असे कोणालाही वाटले नव्हते.
सुरेश रैनाचा क्रिकेटला अलविदा
सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. सगळीकडे धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू असताना भारतीय संघासाठी सुरेश रैनाचे योगदानही विसरता येणार नाही. मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करणारा भरवशाचा फलंदाज, कामचलाऊ फिरकीपटू आणि उत्तम क्षेत्ररक्षक अशी तिहेरी भूमिका रैनाने भारतीय संघात निभावली. सध्या रैना धोनीसोबत चेन्नईत आयपीएलच्या आगामी हंगामाची तयारी करतो आहे.
काही दिवसांपूर्वीच रैना दुसर्यांदा बाबा झाला. रैनाची पत्नी प्रियांकाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. रैनाच्या निवृत्तीची बातमी समजल्यानंतर पत्नी प्रियांकानेही ट्विटरवर त्याचे अभिनंदन करत मला तुझा अभिमान असल्याचे म्हटले आहे.
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत रैनाने अनेक महत्त्वाचे विक्रम केले. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही प्रकारात शतकं झळकावणारा रैना हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नसले तरीही आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये तो खेळत होता. भारतीय संघात रैना आणि धोनीचा याराना परिचित आहे. आपल्या मित्रापाठोपाठ निवृत्ती स्वीकारणे रैनाने पसंत केले.
गांगुलीने दिली प्रतिक्रिया
भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या निवृतीनंतर देशासह जगातून प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी देखील धोनीप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गांगुलीने धोनीचे तोंडभरुन कौतुक केले आहे.
हा एका युगाचा अंत आहे. तो भारत आणि जगातील क्रिकेटसाठी उत्तम खेळाडू राहिला, अशी प्रतिक्रिया सौरव गांगुलीने बीसीसीआयतर्फे दिली. त्याची कप्तानीची क्षमता एकदम वेगळी होती. क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये याची बरोबरी करणे कठीण होईल, असेही तो म्हणाले.
सुरुवातीच्या दिवसात धोनीच्या बॅटिंगने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. प्रत्येक गोष्टीचा अंत आहे आणि हा शेवट गोड आहे. यष्टिरक्षक म्हणून ओळख बनवून देशाचे नाव रोशन करता येण्याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. धोनीसारखी नेतृत्व क्षमता मिळणे खूप कठीण आहे. त्याचे करियर खूप छान होते. त्याला खूप शुभेच्छा देतो, असे बीसीसीआयतर्फे लिहिण्यात आले आहे.
सचिन तेंडुलकरचे ट्विट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विट करुन आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. सचिनचे विश्वकप जिंकण्याचे स्वप्न धोनीच्या कॅप्टनसीमध्ये पूर्ण झाले होते. त्यामुळे 2011 हा क्षण स्पेशल असल्याचे सचिनने म्हटले आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये तुझे योगदान खूप मोठं आहे. तुझ्यासोबत 2011 विश्वचषक जिंकणे आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. तुला आणि तुझ्या परिवाराला सेकंड इनिंगसाठी शुभेच्छा!