महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा महायुती जिंकेल – कृष्णा हेगडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ डिसेंबर २०२३ | फलटण |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष वाढीचे आमचे लक्ष आहे. पक्षाच्यावतीने ‘गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. आगामी २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा महायुती जिंकेल व नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास शिवसेनेचे विलेपार्ले मुंबई येथील माजी आमदार व माढा लोकसभा मतदारसंघाचे पक्षनिरीक्षक कृष्णा हेगडे यांनी व्यक्त केला आहे.

माढा लोकसभा मतदार संघ व फलटण तालुक्याचा आढावा कोळकी येथील विश्रामगृह येथे पदाधिकार्‍यांच्या बैठकीद्वारे घेतल्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, युवासेना प्रमुख रणजित भोसले, महिला जिल्हा प्रमुख शारदाताई जाधव, फलटण तालुका प्रमुख पिंटू तथा नानासो इवरे आदींची उपस्थिती होती.

शिवसेना पक्ष वाढीसाठी राज्यांमध्ये ४० निरीक्षक सध्या कार्यरत आहेत. फलटण तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष वाढीसाठी विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. पक्षवाढीच्या दृष्टीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवदूत नेमण्यात येणार आहेत. एका बूथमध्ये १० शिवदूत नेमण्यात येणार आहेत तर लोकसभा मतदार संघामध्ये १२ ते १४ हजार शिवदूत नेमण्यात येणार आहेत. याशिवाय बूथप्रमुख व गटप्रमुख यांच्याही नेमणुका केल्या जाणार आहेत. या बरोबरीनेच शासनाच्या वतीने लोकहितासाठी जे उपक्रम, योजना राबविल्या जात आहेत. त्याचा लाभ प्रत्यक्षात लोकांपर्यंत कितपत पोचला आहे याचीही पाहणी केली जाणार आहे. आपण माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये येणार्‍या प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा आढावा प्रत्यक्ष फिरून घेतला आहे, तो आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करणार असल्याचे हेगडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष वाढीसाठी विशेष व्यूव्हरचना केली आहे. आगामी सहा महिन्यांमध्ये पक्षाची ताकद निश्चितपणे दिसून येईल. आम्ही महायुतीमध्ये असलो तरी पक्षवाढ करणे हा आमचा अधिकार आहे, त्या पद्धतीने आमचे काम सुरू आहे. फलटण मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याचा आहे. या मतदारसंघावरचा हक्क आम्ही मी सोडणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत येथून निश्चितपणे शिवसेनेचाच उमेदवार विजयी होईल, या दृष्टीने आमचे काम चालू आहे असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी यावेळी सांगितले. शासनाच्या विविध राज्य व जिल्हास्तरीय समित्यांवर अशासकीय सदस्य म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची निवड होणे अपेक्षित आहे परंतु तसे होताना दिसून येत नाही. काही लोक मनमानी करत आहेत हे आम्ही वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले आहे. ज्या निवडी झाल्या आहेत त्या रद्द करण्याचे अधिकार आपल्याला आहेत. निवडी झाल्या म्हणजे त्यांना ताम्रपट दिलेला नाही. आम्ही आमचा वाटा मागणार आहोत. त्यामुळे अशा समित्यांवर शिवसेनेचे कार्यकर्ते अशासकीय सदस्य म्हणून निश्चितपणे दिसून येतील, असेही जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!