महायुतीच्या पार्लिमेंट्री कमिटीची बैठक सुरू; उमेदवार निवडीचे सर्वाधिकार प्रल्हाद साळुंखे-पाटलांकडे सुपुर्द?


स्थैर्य, फलटण, दि. १५ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, आज हॉटेल निसर्ग येथे महायुतीच्या पार्लिमेंट्री कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत उमेदवारी निश्चितीबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकार ज्येष्ठ नेते प्रल्हाद (तात्या) साळुंखे-पाटील यांना देण्यात येणार आहेत. महायुतीमधील सर्व घटक पक्षांचा समन्वय साधून आणि जिंकून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह पार्लिमेंट्री कमिटीच्या सर्व सदस्यांची प्रमुख उपस्थिती आहे. सर्वांच्या सहमतीने अंतिम यादी तयार करण्यावर भर दिला जात आहे.

सध्या बैठक सुरू असून आतमध्ये खलबते सुरू आहेत. नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असणार, यावर या बैठकीत शिक्कामोर्तब होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीने नगराध्यक्षपद भाजपच्या कमळ चिन्हावर लढवण्याची घोषणा यापूर्वीच केली असल्याने त्या चिन्हावर कोण उमेदवार असणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार, दि. १७ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच बैठकीनंतर उमेदवारांची नावे घोषित केली जाणार, की अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी चित्र स्पष्ट होणार, याबाबत नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

महायुतीने फलटण नगरपालिकेत एकहाती सत्ता आणण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने प्रत्येक प्रभागातील उमेदवाराची चाचपणी या बैठकीत केली जात आहे. प्रल्हाद साळुंखे-पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडे सर्वाधिकार दिले आहेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बैठकीनंतर महायुतीचे नेते काय अधिकृत घोषणा करतात, याकडे संपूर्ण फलटण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. हॉटेल निसर्ग परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली असून, निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे.


Back to top button
Don`t copy text!