
स्थैर्य, फलटण, दि. 16 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे दोन दिवस (आज व उद्या) शिल्लक राहिले आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतल्यास, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे पारडे जड असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. शहरातील अनेक दिग्गज नेत्यांनी रणजितसिंह यांच्यासोबत विकासाच्या नव्या वाटेवर चालण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.
फलटण शहराचा विचार करता सद्यस्थितीत महायुतीमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक दिग्गज नेते एकत्र आले आहेत. इतकेच नव्हे तर महायुतीच्या गटातील अनेक भावी नगरसेवकांनी आपली उमेदवारी निश्चित मानून प्रभागात सक्रिय प्रचारालाही सुरुवात केली आहे. स्पष्ट दिशा आणि मजबूत नेतृत्व यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीचा निकाल काय लागणार, याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत.
दुसरीकडे, गेल्या ३० वर्षांपासून सत्तेत असलेल्या राजे गटाची अवस्था मात्र संभ्रमाची असल्याचे चित्र आहे. निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक असतानाही पक्ष, चिन्ह आणि उमेदवार अद्याप अंतिम झालेले दिसत नाहीत. नेतृत्वाकडून उमेदवारांना उमेदवारीबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही, त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार अजूनही गुलदस्त्यातच आहेत.
राजे गटाच्या या मौनामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. राजकीय वर्तुळात सध्या राजे गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही किंवा स्पष्टता समोर आलेली नाही. त्यामुळे ऐनवेळी नक्की कोणत्या चिन्हावर लढायचे, हा प्रश्न उमेदवारांना सतावत आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत, त्या ठिकाणी प्रवेश होणार का ? असा प्रश्न सुद्धा उपस्थित राहत आहे.
एकीकडे महायुतीचे नियोजनबद्ध प्रचारकार्य सुरू झाले असताना, दुसरीकडे विरोधक अद्याप चाचपडत असल्याचे चित्र फलटणमध्ये दिसत आहे. महायुतीचे उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना, विरोधी गटाचे उमेदवार अद्याप ‘एबी फॉर्म’ आणि चिन्हाच्या प्रतीक्षेत आहेत.
या राजकीय घडामोडींमुळे शहरातील जनमत महायुतीच्या बाजूने झुकत असल्याचे बोलले जात आहे. विकासाच्या मुद्द्यावर आणि सक्षम नेतृत्वाखाली महायुती एकहाती सत्ता आणण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सध्याचे चित्र आहे.
उर्वरित दोन दिवसांत राजे गट काय भूमिका घेतो आणि आपले पत्ते कधी उघड करतो, यावर निवडणुकीची पुढील समीकरणे अवलंबून असतील. मात्र, सद्यस्थितीत तरी महायुतीने आघाडी घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

