‘महाविस्तार एआय’ ॲप हजारो शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव


सासकल आणि धुमाळवाडीत डिजिटल शेतीचा प्रयोग यशस्वी; तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते सन्मान.

स्थैर्य, फलटण, दि. ३१ डिसेंबर : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘महाविस्तार एआय’ (MahaVistar AI) ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे. फलटण तालुक्यातील सासकल आणि धुमाळवाडी गावांमधील हजारो शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये हे ॲप डाऊनलोड करून देत त्यांना डिजिटल साक्षर करण्यासाठी पुढाकार घेणारे सहाय्यक कृषी अधिकारी आणि ‘कृषी सेवारत्न’ सचिन जाधव यांचा कृषी विभागाच्या वतीने गौरव करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रचार

सासकल येथील सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी आपल्या कार्यक्षेत्रात या ॲपचा प्रभावी प्रचार आणि प्रसार केला आहे. त्यांनी सासकल गावात ६४४ आणि धुमाळवाडी गावात ३२९ शेतकऱ्यांना हे ॲप डाऊनलोड करून दिले आहे. केवळ ॲप इन्स्टॉल न करता, त्यातील ‘चॅटबोट’ (Chatbot) सुविधेचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षणही त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

काय आहे ‘महाविस्तार एआय’चा फायदा?

या ॲपमधील एआय चॅटबोटच्या माध्यमातून शेतकरी थेट आपल्या पिकांविषयीचे प्रश्न विचारू शकतात. पिकावरील कीड व रोग नियंत्रण, उत्पादन वाढीसाठीचे आधुनिक तंत्रज्ञान आणि खतांचे व्यवस्थापन याबाबतची अचूक माहिती शेतकऱ्यांना मिळत आहे. जाधव यांनी हे तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्याने पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होत आहे.

सन्मान सोहळा

सचिन जाधव यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. फलटणचे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!