गॅस दरवाढीमुळे ’महाविकास’ने पेटवली चूल

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; सरकारविरोधात केली घोषणाबाजी


सातारा – जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून आंदोलन करताना महाविकास आघाडीचे कार्यकर्ते.
स्थैर्य, 14 मार्च, सातारा : केंद्र व राज्य सरकारच्या नियोजनाअभावी सर्व सामान्यांना पुरेसे इंधन पुरवठा होत नाही. राज्यासह जिल्ह्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा घरगुतीसह छोटे हॉटेल व्यावसायिक, चहा, नाष्टा सेवा देणारे व्यवसायिक, बेकरीवाले, दवाखाना यांच्यावर परिणाम झाला आहे. याच्या निषेधार्थ आज सातारा शहर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून स्वयंपाक करत केंद्र व राज्यातील सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

महाविकास आघाडी सातारा शहरचे समन्वयक सुनील काळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत देण्यात आली. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा प्रभाव आता आपल्या घरापर्यंत पोहोचला आहे. स्वयंपाकाच्या गॅसचा पुरेसे पुरवठा होत नसून त्यातून जनतेचे हाल होत आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचानिषेध नोंदवत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी दिलेल्या निवेदनात महाविकास आघाडीने म्हटले, की राज्य व केंद्र शासनाच्या गलथान नियोजनामुळे आपल्याकडे इंधन पुरवठा विस्कळित झाला आहे. इंधन गॅसचा तुटवडा जाणवत आहे. याचा कुटुंबासह हॉटेल, चहाच्या टपर्‍या, बेकरीवाले, दवाखाने, वसतिगृहे, निवासी शाळा प्रभावित झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध करतो. शासनाने तातडीने गॅसपुरवठा शहरासह ग्रामीण भागात सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करावी.

या स्थितीचा गैरफायदा घेणार्‍यांवर कठोर कारवाया कराव्यात, स्थानिक, तालुका पातळीवर इंधन पुरवठा व्यवस्थापन नियोजन तक्रार निवारण समितींच्या बैठका घेऊन समस्या सोडवावी. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील महिलांनी चुली पेटवून सरकारचा निषेध नोंदवला. या आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, नवनिर्माण सेना, भाकप, माकप, शहर सुधार समिती, संयुक्त पुरोगामी संघटना यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुनील काळेकर, शहर उपाध्यक्ष सचिन बागल, मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार, काँग्रेसच्या प्रदेश युवती सरचिटणीस मनीषा साळुंखे, जिल्हा सरचिटणीस सादिकअली बागवान, शिवसेना उबाटाचे शहराध्यक्ष प्रणव सावंत, उपशहराध्यक्ष गणेश अहीवळे, शहर सुधार समितीचे अस्लम तडसरकर, विजय निकम, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुवर्णा पाटील, प्रदेश उपाध्यक्षा समिंद्रा जाधव, महिला जिल्हाध्यक्षा संजना जगदाळे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुषमा घोरपडे, धनश्री महाडिक, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महिला शहराध्यक्षा तेजस्विनी केसरकर, अर्चना देशमुख, नलिनी जाधव, अमोल खुडे, दयानंद नागटिळक, अनिकेत साळुंखे, जितेंद्र बिडकर, अजय राठोड, जिल्हा सरचिटणीस शैलजा कदम, शिवसेनेचे प्रशांत इंगळे, सोमण काळेकर, योगिता काळेकर, जयश्री पवार, रूपाली भगत, रविराज बडदरे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!