उंब्रजमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी?; सहकारमंत्र्यांच्या गटात धुसफूस


स्थैर्य, उंब्रज, दि.४: कऱ्हाड उत्तरमधील सर्वात मोठ्या उंब्रज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तब्बल 64 अर्ज दाखल झाले असल्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. त्यातच महाविकास आघाडीतील सहकारमंत्र्यांच्या अर्थात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटात जागा वाटपावरून बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले असून, अनेक वॉर्डांत आघाडीविरोधात उमेदवार उभे करून भाजपला रान मोकळे करून दिल्याचे चित्र सद्यःस्थितीत निर्माण झाले आहे. प्रत्यक्षात निवडणुकीचे चित्र सोमवारी (ता. चार) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल.

उंब्रज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 17 जागांसाठी तब्बल 64 अर्ज दाखल आहेत. अनेक वॉर्डांत अपेक्षेपेक्षा जादा अर्ज दाखल झालेले आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत चार जानेवारी असल्याने अनेक उमेदवारांची अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी सुरू झाली आहे. उंब्रजमध्ये दुरंगी वाटणारी लढत आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलेली आहे. महाविकास आघाडी विरोधात भाजप असे चित्र सुरवातीला दिसत होते. मात्र, महाविकास आघाडीतील सहकारमंत्र्यांच्या गटात बिघाडी झाल्याने दोन गट निर्माण झाले आहेत. यामुळे अनेक वॉर्डांत महाविकास आघाडीस आव्हान निर्माण झाले आहे, तर भाजपने आपले उमेदवार प्रत्येक वॉर्डात उभे करून महाविकास आघाडीस शह देण्यासाठी कंबर कसली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होताच महाविकास आघाडीतील पक्षांनी उमेदवारांची जुळवाजुळव सुरू केली होती; परंतु अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मर्जीतील उमेदवारांना डावलल्याने धुसफूस सुरू झाली. यामध्ये कोणाचा भावकीचा उमेदवार, तर कोणाला गत निवडणुकीत शब्द दिला गेला होता, तर कोणाच्या बुडक्‍यात आदलून बदलून उमेदवारी अशा कारणावरून वातावरण तापले गेले आहे. जुन्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येऊन मोट बांधली असून, आपआपल्या मर्जीतील उमेदवार उभे केले आहेत, तर उभरत्या नेतृत्वाला खाली खेचण्याचा चंग यामुळे सहकारमंत्र्यांच्या गटातच फूट पडली आहे. यामुळे एका गटाने अनेक वॉर्डांत आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. निवडणुकीत गटातच जिरवाजिरवीबरोबर शह कटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. यामुळे उंब्रजसह परिसरात आघाडीत बिघाडीची चर्चा सुरू आहे, तसेच अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या उमेदवारांनी जनमतामुळे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यातच भर करत शिवसेनेच्या काही इच्छुकांनी अपक्ष अर्ज भरून आपली नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील बिघाडीचा फायदा भाजपच्या उमेदवारांना होणारा असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

तिरंगी लढतीचीही शक्‍यता 

दरम्यान, महाविकास आघाडीतील प्रत्येक नेता आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. कोणी कोणासमोर नमायला तयार नसल्यामुळे तिरंगी लढत पाहावयास मिळण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही.


Back to top button
Don`t copy text!