महाविकास आघाडीचा एकच कार्यक्रम, लुटा आणि वाटून खा – भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस मा. सी. टी. रवी


स्थैर्य, मुंबई, दि.२४: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी ही राज्यासाठी महाविनाश आघाडी ठरली असून लुटा आणि वाटून खा एवढाच त्यांचा एक कलमी किमान समान कार्यक्रम आहे. परंतु, भारतीय जनता पार्टी या आघाडीचे लुटीचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्याचे प्रभारी मा. सी. टी. रवी यांनी दिला.

भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते बंगलोर येथून बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले होते. मुंबईत व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आ. आशिष शेलार तसेच मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. भाजपाचे प्रदेश सहप्रभारी मा. ओमप्रकाश धुर्वे आणि मा. जयभानसिंह पवैय्या ऑनलाईन सहभागी झाले होते.

मा. सी. टी. रवी म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात भ्रष्टाचार साथीसारखा वाढत आहे, हे दुर्दैव आहे. राज्यात भ्रष्टाचाराचे तांडव चालू आहे. मंत्र्यांची अनेक प्रकरणे उघड झाली. दोन जणांना राजीनामा द्यावा लागला. महाराष्ट्राला लुटणे एवढे एकच काम चालू आहे. ही आघाडी राज्याला विनाशाकडे नेत आहे. त्यांचा लुटा आणि वाटून खा एवढा एकच किमान समान कार्यक्रम आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या शिवसेनेने हिंदुत्वविरोधी काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. शिवसेना आपले ध्येय विसरली असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न उध्वस्त केले आहे, अशी टीका त्यांनी केली.

ते म्हणाले की, भाजपाने युतीमध्ये निवडणूक जिंकली तरी भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले. तथापि, भाजपाला जनतेच्या मनात स्थान आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत जनतेमधील असंतोष दिसला आणि लोकांनी भाजपाला विजयी केले. लोकांच्या सरकारवरील नाराजीचे आक्रोशात रुपांतर होत आहे.

त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा जनतेला आधार आहे. मा. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत कोविडवर विजय मिळवेल. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. जगत प्रकाश नड्डा जी यांच्या नेतृत्वात पक्षाचा सेवा ही संघटन उपक्रम चालू आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गेले पंधरा महिने कोरोनाच्या साथीत सातत्याने लोकांची सेवा केली आहे.


Back to top button
Don`t copy text!