दैनिक स्थैर्य । दि. ११ डिसेंबर २०२१ । फलटण । राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या प्रवृत्तींना ओबीसी समाजाचे राजकारणातील अस्तित्व संपवायचे आहे. त्यामुळेच राज्य मागासवर्गीय आयोगाची आर्थिक कोंडी करून आरक्षणास कायमचा सुरुंग लावण्याचा प्रयत्न हे महाविकास आघाडी सरकार करत आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाच्या उमेदवारी आरक्षणाच्या गंभीर मुद्द्यावर जाणीवपूर्वक चालढकल करणाऱ्या या महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी केलेला आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टीच्या फलटण संपर्क कार्यालयामधून जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी कामकाजास सुरुवात केली. त्यावेळी जयकुमार शिंदे बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. उषा राऊत, भटक्या विमुक्त जमाती सेलचे अध्यक्ष सुनील जाधव, किसान मोर्चाचे शहराध्यक्ष नितीन वाघ, उपाध्यक्ष निलेश चिंचकर, तालुका सरचिटणीस संतोष जाधव, कार्यालयीन सचिव ऋषिकेश वादे, युवा नेते राहुल शहा, राजाभाऊ देशमाने, बंडोपंत शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.