
स्थैर्य, 8 मार्च, सातारा – महान समाजसुधारक, विचारवंत आणि शिक्षणप्रेमी महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक खटाव तालुक्यातील कटगुण येथे उभारण्याला अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना महात्मा फुलेंच्या स्मारक उभारणीची घोषणा करताच कटगुणकर ग्रामस्थ व समस्त फुले प्रेमींनी आनंद व्यक्त केला.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मूळ गावी कटगुण येथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे, अशी मागणी अनेक वर्षे केली जात होती. दर वर्षी महात्मा फुले जयंतीच्या कार्यक्रमात येथील स्मारकाबाबत उहापोह केला जात होता. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे कटगुण येथील ग्रामस्थांनी समारकाबाबत पाठपुरावा सुरु ठेवला होता. ना. गोरेंच्या प्रयत्नातून नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचा प्रश्न नुकताच मार्गी लागला आहे. या स्मारकासाठी 142 कोटींची मोठी तरतूद होवून प्रत्यक्ष कामही सुरु झाले आहे. त्याच वेळी कटगुण येथील महात्मा ज्योतिबा फुलेंच्या स्मारकासाठीही निधीची मागणी ना. गोरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. अर्थसंकल्प सादर करताना देवेंद्र
फडणवीस यांनी कटगुण येथे महात्मा फुलेंचे स्मारक उभारण्याची घोषणा करताच कटगुण ग्रामस्थ व समस्त फुले प्रेमींनी आनंद व्यक्त केला.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षण, सामाजिक समानता आणि अंधश्रध्दा निर्मूलनासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांना भारतीय समाजसुधारणेचे महान जनक मानले जाते. त्यांचे कार्य प्रत्येक पीढीला मार्गदर्शक आहे. आजच्या आणि येणार्या पिढ्यांसाठी महात्मा फुलेंचे विचार प्रेरणादायी ठरणार आहेत, त्यासाठी कटगुण येथे त्यांचे भव्य स्मारक उभारणे क्रमप्राप्त होते. अनेकांनी येथील स्मारकासाठी शब्द दिले मात्र प्रत्यक्षात काम झाले नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाला मंजुरी दिली आहे. कटगुण येथे स्मारकासाठी आवश्यक असणारी, गायरान जमीन उपलब्ध नाही शासकीय जागा असेल तर ठिक अन्यथा आम्ही नायगावप्रमाणे स्मारकासाठी जागा खरेदी करुन् कटगुण येथील स्मारक उभारणार आहोत. लवकरच आराखडा तयार करुन लागेल तितका निधी उपलब्ध करणार आहे. महात्मा फुलेंच्या 200 व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचेही ना. गोरे यांनी सांगितले.

