
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला ११ एप्रिल २०२७ रोजी २०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ११ एप्रिल २०२६ ते २०२७ हे द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. फुले यांच्या अतुलनीय सामाजिक योगदानाचा वेध घेणारा हा विशेष लेख.
स्थैर्य, फलटण, दि. 11 एप्रिल : भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात महात्मा ज्योतिराव फुले यांचे स्थान अत्यंत अग्रगण्य आणि प्रेरणादायी आहे. ११ एप्रिल १८२७ रोजी जन्मलेल्या या महान विचारवंताच्या कार्याला ११ एप्रिल २०२७ रोजी २०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे ११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२७ हा कालावधी त्यांचे ‘द्विशताब्दी जयंती वर्ष’ म्हणून साजरा करणे ही समाजासाठी एक ऐतिहासिक संधी आहे. या निमित्ताने त्यांच्या विचारांचा पुनर्विचार करणे आणि त्यांना कृतीत उतरवणे काळाची गरज आहे.
महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते एक क्रांतिकारक विचारवंत, शिक्षणप्रणेते, स्त्रीस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आणि शेतकरीहिताचे खरे रक्षक होते. त्यांनी अज्ञान, अंधश्रद्धा, जातिभेद आणि सामाजिक अन्याय यांच्या विरोधात निर्भीडपणे लढा उभारला. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू मानवता, समता आणि बंधुता हाच राहिला.
शिक्षणक्रांतीचा पाया आणि दूरदृष्टी:
-
१८४८ मध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून भारतीय समाजात अभूतपूर्व क्रांती घडवली. या कार्यात त्यांना सावित्रीबाई फुले यांची मोठी साथ लाभली. सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या.
-
त्यांनी केवळ शिक्षण दिले नाही, तर स्त्रियांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला. महात्मा फुले यांनी शूद्र-अतिशूद्र आणि मागासवर्गीय मुलांसाठीही शाळा सुरू केल्या.
-
१८८२ मध्ये हंटर आयोगासमोर साक्ष देऊन प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याची मागणी त्यांनी केली. ६ ते १४ वयोगटातील मुला-मुलींसाठी शिक्षण अनिवार्य असावे, मातृभाषेतून शिक्षण दिले जावे, तसेच शिक्षकांना योग्य प्रशिक्षण व वेतन मिळावे, अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती.
सामाजिक संघर्ष आणि सत्यशोधक विचार:
२४ सप्टेंबर १८७३ रोजी त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. या संस्थेचा मुख्य उद्देश जातीय भेदभावाचे निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक न्यायाची स्थापना करणे हा होता. धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या शोषणाला विरोध करून समाजाला त्यांनी विवेकाची दिशा दिली. “माणसाचे मूल्य त्याच्या जन्मावर नव्हे, तर कर्तृत्वावर ठरावे,” हा फुलेंचा विचार आजही अत्यंत महत्त्वाचा आहे.
स्त्रीसन्मानासाठी लढा आणि अनाथ मातांना आधार:
-
स्त्री शिक्षणाबरोबरच त्यांनी विधवांच्या सन्मानासाठी मोठे कार्य केले. १८८९ मध्ये त्यांनी नाभिक समाजाला संघटित करून ‘नाभिक संप’ घडवून आणला, ज्यामुळे विधवांचे केशवपन थांबवण्यास मोठी मदत झाली.
-
त्यांनी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू करून अनाथ व अविवाहित मातांना मोठा आधार दिला. हे त्या काळात अत्यंत क्रांतिकारक पाऊल होते.
शेतकरी, समाजासाठी लेखन आणि उद्योजकता:
महात्मा फुले यांनी आपल्या लेखनातून अफाट समाजजागृती केली. ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्याचा आसूड’, ‘सार्वजनिक सत्यधर्म’, ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘इशारा’ आणि ‘सत्सार’ यांसारख्या ग्रंथांतून त्यांनी सामाजिक विषमता आणि शोषणावर कठोर प्रहार केला. महात्मा फुले हे द्रष्टे उद्योजकही होते. खडकवासला धरण, कात्रज तलाव आणि पुण्यातील अनेक बांधकामांत त्यांनी कंत्राटदार म्हणून काम केले व मिळालेला नफा समाजकार्यासाठी खर्च केला.
विचारांचा प्रभाव आणि आजच्या काळातील महत्त्व:
महात्मा फुले यांच्या विचारांनी पुढील अनेक पिढ्यांना मोठी प्रेरणा दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना आपले गुरु मानले. फुले-आंबेडकर विचारसरणी ही आजही सामाजिक न्यायाच्या लढ्याची भक्कम पायाभरणी आहे.
आजच्या युगातही महात्मा फुले यांचे विचार अत्यंत सुसंगत आहेत. शिक्षणातील असमानता, स्त्रीवरील अन्याय आणि सामाजिक विषमता अजूनही पूर्णतः नष्ट झालेली नाही. महात्मा फुले यांचे जीवन म्हणजे विचार, कृती आणि संघर्ष यांचे अद्वितीय मिश्रण आहे. समता, शिक्षण, स्त्रीसन्मान आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा स्वीकार करूनच आपण त्यांना खरी आदरांजली अर्पण करू शकतो. त्यांच्या प्रेरणेनेच एक समताधिष्ठित, प्रगत आणि न्याय्य भारत घडू शकेल!
लेखक: आयु. सोमीनाथ पोपट घोरपडे, (सामाजिक कार्यकर्ता) संस्कार सचिव, भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) मोबाईल नं. ९२८४६५८६९०
