दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२१ । मुंबई । ई स्वरूपातील महात्मा गांधी संकलित वाङमय आज महाराष्ट्राला उपलब्ध होत आहे. मात्र लवकरच जगातील प्रत्येक वाचनालयात ते कसे उपलब्ध होईल यासाठी दर्शनिका विभागाने प्रयत्न करावा असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख: यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते आज गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागातर्फे ई – स्वरूपात तयार करण्यात आलेल्या महात्मा गांधी संकलित वाङमयाचे आज प्रकाशन करण्यात आले. सदर साहित्य पेनड्राईव्ह स्वरुपात प्रथमच प्रकाशित होत आहे. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात तसेच दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दि.प्र.बलसेकर उपस्थित होते.
आजची पिढी, जी स्मार्टफोन, इ-बुक, ऑडिओ बुक, टॅबलेट आणि लॅपटॉपचा वापर करते त्या पिढीला राष्ट्रपिता महात्मा गांधी संकलित वाङमय भाग -१ च्या १ ते ५० खंडांचे ई – स्वरुपात उपलब्ध करून दिल्याने नक्कीच याचा फायदा होणार आहे, असे सांस्कृतिक कार्य अमित देशमुख यांनी सांगितले. नव्या पिढीला, नव्या जगाला ओळख करून देण्यासाठी हे वाङमय उपयोगी ठरेल अशी आशा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती अशा पद्धतीने साजरी करता आली याचा आज मला आनंद होत आहे. हा ई-ग्रंथ समाजोपयोगी ठरो अशा सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
श्री. देशमुख म्हणले की,ई- स्वरूपातील महात्मा गांधी संकलित वाङमयाचे प्रकाशन दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी, या उपक्रमाचे कौतुक करताना श्री देशमुख म्हणाले की, आज आपण डिजिटल युगात आहोत. आजचा कार्यक्रम डिजिटल आहे. प्रकाशनाचे स्वरूप डिजिटल आहे. काळाचा अचूक वेध घेत दर्शनिका विभागाची कार्यशैली, कार्यप्रणाली ती देखील काळाशी अनुरूप करण्याचा प्रयत्न या विभागाने केला हे कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे महात्मा गांधी संकलित वाङमय संपूर्ण जगाला सहजपणे उपलब्ध होईल, त्याकरिता महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा हे देखील अतिशय महत्त्वाचे आहे.
या खंडांमध्ये महात्मा गांधी यांचे स्फूर्तिदायक जीवन, त्यांचा व्यक्तिविकास, त्यांनी केलेली विविध कार्ये, त्यांची भाषणे, लेख व पत्रसंग्रह अशा विपुल साहित्याचा यात समावेश आहे. याद्वारे महात्मा गांधीचे विचार समजून घेण्याची संधी वाचकांना उपलब्ध होईल. जगात फादर ऑफ नेशन ज्यांची ओळख राहिली आहे त्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा नामोल्लेख होतो. तसेच जगात भारत आणि महात्मा गांधी ही अशी एकरूप नावे जगाने पहिली आहेत. जगात भारताचा उल्लेख ‘ लँड ऑफ गांधी ‘ असा होतो, असेही यावेळी श्री देशमुख म्हणाले.
यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी सांगितले की, येत्या काळात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने दर्शनिका विभाग अशाच स्वरूपाचे नवनवीन उपक्रम हाती घेणार असून राज्यातील गड किल्ल्यांची माहिती, त्याचप्रमाणे विविध इतिहासकालीन साहित्याची निर्मिती करणार आहे. त्याचा फायदा या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे .
या कार्यक्रमाचा समारोप, उपसचिव विलास थोरात यांनी या कामात ज्या सर्वांचा हातभार लागला आहे त्या सर्वांचे आभार मानून केला.