दैनिक स्थैर्य । दि.३० जानेवारी २०२२ । मुंबई । राष्ट्रपिता महात्मा गांधीं ही व्यक्ती नसून विश्वशांती, मानवकल्याणाचा महान विचार आहे. गांधीजींनी सत्य, अहिंसा, शांततेच्या मार्गानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. या मूल्यांचं महत्त्व जगाला समजावून सांगितलं. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्काचा लढा लढला. साधी राहणी, उच्च विचारांचा आदर्श प्रस्थापित केला. मानवतेच्या कल्याणात विश्वाचं कल्याण आहे ही शिकवण दिली. खेडी स्वयंपूर्ण झाली तरंच देश स्वयंपूर्ण होईल हा त्यांचा विश्वास होता. महात्मा गांधीजींच्या विचारातच देशाचं, जगाचं, मानवाचं कल्याण सामावलं आहे. महात्मा गांधी आणि त्यांचे विचार अमर आहेत. त्या विचारांवर चालण्यासाठी आपण पुन्हा एकदा दृढसंकल्प होऊया,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा गांधींजींच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे स्मरण करुन कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेच्या रक्षणासाठी प्राणांचं बलिदान करणाऱ्या शहीद वीरांचे स्मरण करुन उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनाही हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन केले आहे.