दैनिक स्थैर्य । दि. 15 ऑगस्ट 2023 । फलटण । ‘‘फलटणमध्ये आम्ही छोट्या लोकांनी एकत्र येवून महात्मा एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था सुरु केली. समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीमुळे लोकाश्रयावर या संस्थेची सुरु असलेली वाटचाल अभिमानास्पद आहे’’, असे प्रतिपादन महात्मा एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह तथा ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी केले.
15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती चतुराबाई शिंदे बालक मंदिर, श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळा व आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचा ध्वजारोहण सोहळा पत्रकार कॉलनीच्या प्रांगणात साप्ताहिक ‘आदेश’चे संपादक विशाल शहा यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी रविंद्र बेडकिहाळ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर विपुल ड्रेसेसचे विकास शहा, प्राथमिक विभाग शालेय समिती अध्यक्ष रविंद्र बर्गे, माध्यमिक विभाग शालेय समिती अध्यक्षा सौ.अलका बेडकिहाळ, पत्रकार प्रसन्न रुद्रभटे, रोहित वाकडे, मुख्याध्यापक मनिष निंबाळकर, भिवा जगताप, श्रीमती सुरेखा सोनवले आदींची उपस्थिती होती.
‘‘संस्थेच्या बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक या तिन्ही शाखांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती उत्तम आहे. भारती विद्यापीठाच्यावतीने घेण्यात येणार्या गणित व इंग्रजी परिक्षांमध्ये आपल्या शाखेचे विद्यार्थी नेहमीच यश संपादन करीत असतात हे अभिनंदनीय आहे’’, असे बेडकिहाळ यांनी स्पष्ट केले.
यावेळी विशाल शहा, रोहित वाकडे यांनीही थोडक्यात मनोगत व्यक्त करुन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपशिक्षीका निलम लोखंडे यांनी मानले.