फलटण तालुक्यात उद्यापासून “महास्वच्छता अभियान”; सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 07 जानेवारी 2023 | फलटण | फलटण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उद्या सोमवार दि. ०८ रोजी सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत “महास्वच्छता अभियान” राबवण्यात येणार आहे; अशी माहिती फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी दिली.

गावची स्वच्छता शाश्वत राखण्यासाठी जे नागरीक सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करतात, रस्त्याच्या व गावच्या सार्वजनिक ठिकाणी कचरा / प्लॅस्टीक टाकतात व गावत घाणीचे साम्राज्य निर्माण करतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणासाठी तालुकास्तरावर नोडल अधिकारी पदाचे संपर्क अधिकारी नेमलेले आहेत. हे अधिकारी त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात जाऊन सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणार आहेत; तरी सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी दुर्गंधी करू नये व आपल्या गावात स्वच्छता राखून प्रशासनास सहकार्य करावे; असे आवाहन गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना गटविकास अधिकारी बोडरे म्हणाले कि; महास्वच्छता अभियानाचा मुख्य उदेश गावातील सर्वत्र पडलेला कचरा गोळा करणे. यासोबतच गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला जास्त कचरा असलेले क्षेत्र, रेल्वेलाईन, बसस्थानके, शहर लगतच्या राष्ट्रीय / राज्य मार्गाच्या जागा, धार्मीक स्थळे, सार्वजनिक व खाजगी कार्यालये, आरोग्य संस्था, शाळा व महाविद्यालये त्यांचा परिसरासह इतर ठिकाणाची स्वच्छता करण्यासाठी राबवण्यात येणार आहे.
या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अभियानामध्ये गावातील प्रत्येक ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी, शालेय विद्यार्थी, शासकीय व निम‌शासकीय कर्मचारी, ग्रामस्तरीय स्वयंसेवी संस्था व इतर यांच्या सर्वांमार्फत हे अभियान राबवण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!