
स्थैर्य, 5 फेब्रुवारी, सातारा : येथील श्री उत्तर चिदंबरम् नटराज मंदिरात ’महाशिवरात्री’ निमित्त ’रुद्र व संगीत आणि नृत्यांजली सेवा’ होणार आहे. या आनंददायी सोहळ्याचे औचित्य साधून लोककल्याणकारक, रोगनिवारक, पापनाशक तसेच सुख, शांती व निरंतर धन धान्य समृद्धि देणार्या अशा रुद्र अनुष्ठानाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव शुक्रवार दि.6 फेब्रुवारी, 2026 ते रविवार दि.15 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे.
महाशिवरात्री महोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या संगीत व नृत्यंजली सेवा कार्यक्रमात श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती कला मंदिर कला मंचाच्या रंगमंचावर शुक्रवार दि. 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य उद्घाटन सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांचे हस्ते होणार असून त्यानंतर पुणे येथील कलावंदना डान्स स्कूलच्या गुरु श्रीमती कल्पना बालाजी व सहकलाकारांची भरतनाट्यम नृत्य सेवा संपन्न होणार आहे.
शुक्रवारी या संगीत व नृत्य महोत्सवात पुणे येथील सुप्रसिद्ध नृत्यांगना कल्पना बालाजी या आपले नृत्याविष्कार सादर करणार आहेत. गेली 25 वर्षे त्या भरतनाट्यम ची सादरीकरण संपूर्ण देशात तसेच परदेशातही सादर करीत आहेत .
नृत्यविभूषण पुरस्काराने त्यांना 2017 गौरव प्राप्त झाला असून त्यांनी लिहिलेल्या तंजावर येथील शहाजी महाराज या मराठी राज्यावरील नृत्याला विशेष पारितोषिके मिळाली आहेत. नृत्या बरोबरच योग साधनेतही गेली तीन दशके त्या प्रवीण असून त्यांना आजपर्यंत अनेक नामांकित पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. नृत्याविष्कार सादर होत असतानाच सातारा शहरातील स्थानिक कलाकारांना चित्रकला, मूर्तीकला यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे.
यावेळी कलाकारांनी उपस्थित राहून आपली कला सादर करावी असे आवाहन या महोत्सवाच्या संयोजिका उषा शानभाग यांनी केले आहे. महाशिवरात्री महोत्सवानिमित्त होणार्या अनुष्ठानास सहभागी होण्याचे आवाहन व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग यांनी केले आहे.

