
स्थैर्य, 23 जानेवारी, सातारा : श्री आनंद नटराजा व श्री शिवकामसुंदरी या देवतांच्या कृपेने, तसेच श्री कांचीकामकोटीपीठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती महास्वामी तसेच श्री कांची कामकोटीपीठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री जयेंद्र सरस्वती व श्री कांचीकामकोटी पीठाचे शंकराचार्य पीठाधिपती परमपूज्य श्री शंकर विजयेंद्र सरस्वती व त्यांचे शिष्य श्री श्री सत्यचंद्रशेखरेंद्र सरस्वती यांचा पूर्णानुग्रह आणि शुभाशिर्वादाने श्री उत्तर चिदंबरम् नटराज मंदिरात ’महाशिवरात्री’ निमित्त ’रुद्र व संगीत आणि नृत्यांजली सेवा’ संपन्न होणार आहे. या आनंददायी सोहळ्याचे औचित्य साधून लोककल्याणकारक, रोगनिवारक, पापनाशक तसेच सुख, शांती व निरंतर धन धान्य समृद्धि देणार्या अशा रुद्र अनुष्ठानाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव शुक्रवार दि. 6 फेब्रुवारी, 2026 ते रविवार दि.15 फेब्रुवारी 2026 म्हणजेच महाशिवरात्री पर्यंत श्री नटराज मंदिर, सातारा येथे संपन्न होणार आहे.
महाशिवरात्री महोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन श्री आनंद नटराज व श्री शिवकामसुंदरी या देवता तसेच परमपूज्य महास्वामिंकडून कृपानुगृहित व्हावे अशी मंदिराचे विश्वस्त आणि महाशिवरात्री महोत्सव सेवा समिती यांच्या वतीने नम्म्र विनंती करण्यात येत आहे.
महाशिवरात्रीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांमध्ये वेदमूर्ती जगदीश शास्त्री भट्ट गुरुजी आणि वेदमूर्ती दत्ताशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी 2026 पासून विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात संपन्न होणार आहेत यामध्ये सकाळी आठ ते बारा या वेळेत अनुज्ञा ,विघ्नेश्वर पूजा, प्रधान संकल्प, ग्रामदेवता पूजन स्वस्ति ,पुण्य वाचन, नांदी श्राद्ध, गणपती होम ,नवग्रह होम होऊन आरती व प्रसाद वितरण केला जाणार आहे. शनिवारी दि.14 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते 11 या वेळेत एकादश कलश स्थापना व लघुरुद्र जप,कमार्चना संपन्न होणार आहे. त्यानंतर महाशिवरात्रीला रविवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते 11 या वेळेत लघुण्यास एकादशी रुद्र जप , लघु रुद्र होऊन व पूर्णाहूती होणार असून यावेळी महामंगल आरती व कलश यात्रा संपन्न होऊन मंदिरातील श्री मुलनाथेश्वर पिंडिस कलश महाअभिषेक संपन्न होणार आहे. त्यानंतर अलंकार, नैवेद्य आरती व प्रसाद वितरण होणार आहे .याच दिवशी रात्री आठ ते 11 या वेळेत कलश स्थापना,लघुरुद्र जप आणि श्री नटराज पाचू पिंडिस कलश अभिषेक संपन्न होणार आहे .
महाशिवरात्री संगीत व नृत्यंजली सेवा कार्यक्रमात श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती कला मंदिर सातारा या कलामंचाच्या रंगमंचावर शुक्रवार दि. 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य उद्घाटन सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांचे हस्ते संपन्न होणार असून त्यानंतर पुणे येथील कलावंदना डान्स स्कूल च्या गुरु श्रीमती कल्पना बालाजी व सहकलाकारांची भरतनाट्यम नृत्य सेवा संपन्न होणार आहे .दि.7 फेब्रुवारी रोजी शनिवारी सायंकाळी 6 वाजता मुंबई येथील स्वरालय संगीत विद्यालयाच्या गुरु निशा सतीश कृष्णमूर्ती व त्यांच्या शिष्यांचे भरतनाट्यम होणार आहे .रविवार, दि. 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता नटरंग अकॅडमी ग्रुप, पुणे यांची भरतनाट्यम नृत्य सेवा संपन्न होणार असून दि. 9 फेब्रुवारी रोजी सोमवारी सायंकाळी सहा वाजता पुणे येथील प्रज्ञा जाधव व समूहाचे भरतनाट्यम संपन्न होणार आहे .मंगळवार दि. 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पुणे येथील डॉ. लक्ष्मी आणि सहकलाकारांचे भरतनाट्यम संपन्न होणार आहे.दि. 11 फेब्रुवारी रोजी बुधवारी सायंकाळी सहा ते सात या वेळेत सातारा येथील मानसी सदामते व सह कलाकारांचे कथक नृत्य संपन्न होऊन सायंकाळी सात वाजता लक्ष्मी राजगोपालन यांचे कर्नाटकी संगीत सादर होणार आहे .
गुरुवार दि. 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मुंबई येथील नुपूर नृत्य निकेतन डान्स अकादमीच्या गुरु मीरा मेहता व त्यांच्या शिष्यांची भरतनाट्यम सेवा संपन्न होणार आहे. शुक्रवार, दि. 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पुणे येथील नंदिता कुलकर्णी व सहकलाकारांची कथक नृत्य सेवा सादर होणार आहे. शनिवार दि. 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पुणे येथील संस्कृती नृत्य विद्यालयाच्या कलाकारांचे भरतनाट्यम संपन्न होणार आहे .रविवार दि. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त सकाळी आठ ते बारा या वेळेत स्वरसाधना संगीत विद्यालय ,सातारा यांच्या कलाकारांची शास्त्रीय गायन सेवा संपन्न होऊन सायंकाळी सहा ते आठ या वेळेत सातारा येथील नटराज नृत्यकलाशाला ग्रुपच्या गुरु सौ.आचल घोरपडे व शिष्यांचे भरतनाट्यम सादर होणार आहे. रात्री आठ ते दहा या वेळेत सुधांशु किरकिरे यांच्या नृत्यसाधना संस्थेच्या कलाकारांचे भरतनाट्यम संपन्न होणार आहे .
रविवारी दि.15 फेब्रुवारी रोजी रात्री दहा ते सोमवार दि. 16 फेब्रुवारी सकाळी पाच दरम्यान महाशिवरात्री जागरण कार्यक्रम संपन्न होणार असून हे सर्व कार्यक्रम श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर ट्रस्ट श्री नटराज महिला मंडळ व योगदान सत्संग यांच्या सौजन्याने संपन्न होणार आहेत. लोक कल्याणकारक अनुष्ठानाचा खर्च जनता जनार्दनांच्या सहभागातून व अर्थिक योगदानातून केला जातो. मंदिराच्या सर्वच कार्यक्रमास आपले मौलिक सहकार्य आम्हास लाभते. तरी महाशिवरात्री महोत्सवानिमित्त संपन्न होणार्या अनुष्ठानास आपण तन-मन-धनाने सहभागी व्हावे असे आवाहन नटराज मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग यांनी केले आहे. सर्व कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

