विडणी येथे महाशिवरात्र उत्साहात साजरी


दैनिक स्थैर्य | दि. 28 फेब्रुवारी 2025 | विडणी | विडणी परिसरात विविध शिवमंदिरांमध्ये महाशिवरात्र विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. येथील पुरातन असलेल्या उत्तरेश्वर मंदिरामध्ये व महाकालेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त गावामध्ये शिवमय वातावरण तयार झाले होते. परिसरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच सर्व परिसर भाविकांनी फुलून गेला होता.

महाशिवरात्रीनिमित्त आरती, शिवलीलामृत पारायण, भजन, कीर्तन लघुरुद्र अभिषेक, बेलपुष्पवृष्टी आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शिवरात्रीदिनी भाविकांनी सकाळी आरती झाल्यानंतर दिवसभर रात्रीपर्यंत दर्शनासाठी रांगा लावून हजारांच्या संख्येने दर्शन घेतले. मंदिराच्या आवारामध्ये बेल, फुले ,हार आदी पूजेच्या साहित्याची दुकाने लावण्यात आली होती. दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिरामध्ये अल्पोपहार देण्यात येत होता.

तसेच विडणी गावचे सरपंच सागर अभंग यांनी भाविकांना मोफत केळी व लस्सीचे कार्यकर्त्याच्या उपस्थितीत वाटप केले. रात्री कीर्तन, बेल ,पुष्पवृष्टी झाल्यानंतर सकाळी शिवलीलामृत पारायाणाची समाप्ती व महाप्रसादाने कार्यक्रमांची सांगता झाली. भाविकांनी सढळ हस्ते मंदिरांमध्ये कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवून उत्कृष्ट नियोजन करीत सहकार्य केले.


Back to top button
Don`t copy text!