दैनिक स्थैर्य | दि. २२ मे २०२३ | सातारा |
तरुणाईच्या हाताला काम देणे, ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना नोकर्या दिल्या जात आहेत. आपणाला पर्याय नसतो म्हणून आपण रोजगार मागत असतो. पण, नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. दरम्यान, सातारा जिल्ह्यासाठी आयटी पार्क, स्कील सेंटर, कामगारांसाठी रुग्णालय उभारण्याची घोषणा त्यांनी केली.
खासदार उदयनराजे यांच्या संकल्पनेतून सातारा येथील यशोदा कॅम्पसमध्ये महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, पोलीस अधिक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी सभापती सुनील काटकर, राजेंद्र यादव, प्रा. दशरथ सगरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उदय सामंत म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला आहे. ही योजना गावा-गावापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहे. आपल्याला केवळ रोजगार निर्मितीच करायची नसून उद्योजकांची निर्मिती करायची आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाराष्ट्रात १३ हजार उद्योजक निर्माण झाले आहेत. येत्या वर्षात २५ हजार उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेकांना नोकर्या मिळाल्या आहेत. तथापि, ही नोकरी करतानाही प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. नोकरीतून आपला कसा व्यवसाय सुरू होईल व आपले कुटुंब कसे आपल्या पायावर उभे राहील, याकडे तरुणांचा कल राहिला पाहिजे. रोजगार मिळाल्यानंतर आपण परजिल्ह्यात, परराज्यात व परदेशात जातो, पण यावेळी आपल्या मातीची नाळ तुटू देवू नका. टुरिझमसाठी उद्योग विभागाने साह्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी खा. उदयनराजे भोसले म्हणाले की, आपला भविष्यकाळ हा आपल्या हातात असतो. त्यामुळे युवकांनी आपले ध्येय ठरवावे, जिद्दीने पाठपुरावा करावा. नोकरी मागणारे नव्हे तर देणारे व्हावे.
संधी एकदाच दार ठोठावते, परत येत नाही. त्याचा कसा फायदा घ्यायचा तुम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. आता आपण काय बोलतो ते पाच मिनिटात इतिहासजमा होते. आपल्याला इतिहासजमा व्हायचं नाही. ही तरुणाई म्हणजेच माझा ‘सातबारा’ आहे. मंत्री सामंत यांच्या माध्यमातून तसेच माझ्याकडून जे सहकार्य लागेल ते करू. त्यात कुठेही कमी पडणार नाही, पण तुम्हीही कमी पडू नका. जेवढं करायचं तेवढं कष्ट घ्या. या जिल्ह्याने संपूर्ण देशाला नेतृत्व दिले. पत्रीसरकार, स्त्री शिक्षणाची चळवळ, सत्यशोधक चळवळ अनेक चळवळी या जिल्ह्यात झाल्या. अशा जिल्ह्यात जन्माला यायचं भाग्य लाभलं ते तुम्हाला-आम्हाला. त्याची जाणीव ठेवून मोठे व्हा. मंत्री सामंत येथे हेलिकॉप्टरने आले. तुम्हीही मोठे व्हा अन् तुमचेही हेलिकॉप्टर असू दे. मग मी माझे मित्र सामंत यांना भेटायला तुमच्याच हेलकॉप्टरमधून जाईन, असेही खा. उदयनराजे म्हणाले.
प्रारंभी संग्राम बर्गे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हास्तरीय उद्योग पुरस्कार वितरण, कर्ज मंजुरी, नोकरी मिळाल्याचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
रिकामे असणार्यांकडून आरोप करण्याचे उद्योग
वेदांता फॉक्सकॉन, एअर बस राज्यातून गेल्याची टीका सरकारवर करण्यात येत आहे. पण ज्यांना सध्या काहीच उद्योग नाही ते पत्रकार परिषदा घेवून राज्य सरकारवर टीका करण्याचे उद्योग करत आहेत. वेदांता फॉक्सकॉन शिंदे-फडणवीस सरकारमुळे गेला नाही. तो अगोदरच गेला होता. पण एका वर्षात त्याच्या दुप्पट रोजगार निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, असे सामंत म्हणाले.
कामगारांच्या रुग्णालयासाठी लागणारी जागा उद्योग विभागाकडून देण्यात येईल. पंधरा दिवसांत उद्योग विभागाचा क्षेत्रीय अधिकारी (आर. ओ.) असेल, अशी ग्वाही सामंत यांनी दिली. विभागीय कार्यालय, उद्योग भवन, पावसाळ्यानंतर कौशल्य केंद्र उभारण्यात येईल.