प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ चित्ररथ सज्ज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२२ जानेवारी २०२२ । नवी दिल्ली । राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी होणाऱ्‍या पथसंचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ विषयावरील चित्ररथ सज्ज झाला असून येथील कँटोन्मेंट परिसरातील रंगशाळेत या चित्ररथाच्या अंतिम टप्प्याचे काम पूर्णत्वास येत आहे.

येथील कँटोन्मेंट परिसरातील रंगशाळेत आज केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिनी राजपथावर सादर होणाऱ्‍या चित्ररथाविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी महाराष्ट्रासह 12 राज्यांची आणि 7 मंत्रालयांची चित्ररथ सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्रातर्फे ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ आहे.

‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ चित्ररथाविषयी

यंदाच्या चित्ररथावर दर्शनी बाजूस भव्य ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची 8 फूट उंची आणि 6 फूट रूंद पंखाची देखणी प्रतिकृती आहे. तसेच दीड फूट उंच दर्शविणारे राज्यफुल ‘ताम्हण’ याचे अनेक रंगीत गुच्छ दर्शविले आहेत. त्यावर इतर छोटी आकर्षक फुलपाखरांची लोभस प्रतिकृती आहे.  चित्ररथावर 15 फूट भव्य असा ‘शेकरू’ राज्यप्राणी तसेच युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेल्या ‘कास पठारा’ची प्रतिमा दर्शविण्यात आलेली आहे. चित्ररथाच्या दर्शनी भागात कास पठारावर आढळणारा सरडा ‘सुपारबा’ ३ फूट उंच दर्शविला आहे, त्यामागे राज्यपक्षी ‘हरियाल’ पिवळा कबुतराची प्रतिकृतीही दिसते. चित्ररथाच्या मागील भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेला राज्यप्राणी शेकरूची प्रतिकृती  आणि शेवटी राज्यवृक्ष ‘आंबा’ वृक्षाची प्रतिकृती सुमारे 14 ते 15 फूट उंचीचा आहे.  दुर्मिळ ‘माळढोक’ पक्षी, महाराष्ट्रात नव्याने सापडलेली ‘खेकड्या’ची तसेच, मासा प्रजाती  वाघ, आंबोली झरा, फ्लेमिंगो, मासा, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या 4 ते 5 फूट उंचीच्या प्रतिकृती दिसत आहे. यासह सुंदर कलात्मक दृष्टिकोनातुन जैवविविधता दिसेल असे देखावेही दर्शनी भागावर आहेत. यासर्वांचा समावेश चित्ररथात करून चित्ररथ अधिक देखणा व मनमोहक करण्यात आल्याची माहिती राज्यातील कार्य संस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चौरे यांनी यावेळी दिली.

या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची असून त्याला प्रत्यक्षात उतरविणाऱ्या  कलाकारांचा चमू काम करीत असून हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण जैव वारश्यावरील कवितेच्या ओळी संगीतबद्ध करून गेय रूपात राजपथावर ऐकू  येणार आहेत. यासोबतच राजपथावरून सरकणाऱ्या  चित्ररथासोबत डावी व उजवीकडे दोन-दोन असे चार कलाकार नृत्य सादर करतील.

आज आयोजित पत्रकार परिषदेनंतर ज्या राज्यांना आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमात पुरस्कार मिळाले त्यांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये  महाराष्ट्राने गोंधळ ही लोककला सादर केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्राचा  प्रथम क्रमांक आला असून यावेळी महाराष्ट्राच्या लोककलेचे सादरीकरण करण्यात  झाले.


Back to top button
Don`t copy text!