दैनिक स्थैर्य | दि. १५ जानेवारी २०२५ | फलटण |
सब-ज्युनियर नॅशनल आर्चरी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे राजस्थानच्या वाळवंटात पुन्हा एकदा मराठ्यांनी झेंडा फडकवला आहे. या संघात वाईच्या ओम श्री सोशल स्पोर्ट्स फाउंडेशनचा खेळाडू सार्थक जाधव यांनी सहभाग घेतला होता. त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
जयपूर येथे झालेल्या धनुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून इरफान पठाण, प्रथमेश पार्टे, जय हिंद जगताप, आणि वाईच्या ओम श्री सोशल स्पोर्ट्स फाउंडेशनचा खेळाडू सार्थक जाधव यांनी सहभाग घेतला होता. या संघाला प्रशिक्षक म्हणून प्रणित सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्राच्या संघातील वाईचा सार्थक जाधव याने याआधीही विविध स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावून आपले कौशल्य सिद्ध केले आहे. तो त. ल. जोशी विद्यालय, वाई येथे इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत असून, त्याचे वर्गशिक्षक तुषार चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन त्याला लाभले आहे. त्याच्या यशस्वी प्रवासामागे कुटुंबाचे व प्रशिक्षकांचे अमूल्य योगदान आहे.
जयपूरमधील स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने दाखवलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.