स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२५: देशात इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारने विविध राज्यांसाठी ६७० बसेस मंजूर केल्या आहेत. ‘फेम इंडिया’च्या दुस-या टप्प्यात मोदी सरकारने महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि चंदीगडसाठी ६७० नवीन इलेक्ट्रिक बसेस मंजूर केल्या आहेत. आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश, तामळनाडू, केरळ, गुजरात आणि पोर्ट ब्लेअरमध्ये २४१ चार्जिंग स्टेशनला देखील मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
‘फेम इंडिया’अंतर्गत त्यांनी सर्वांना इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे आवाहन केले आहे. मोदी सरकारने मंजूर केलेल्या ६७० बसेसमध्ये महाराष्ट्रासाठी २४० बसेस, गुजरातसाठी २५० बसेस चंदीगडसाठी ८० बसेस आणि गोव्यासाठी १०० बसेस देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे देखील जावडेकरांनी सांगितले आहे.
जावडेकर फेम इंडियाच्या दुस-या प्रसिद्धीबद्दल म्हणाले की, मी गेल्या एक वर्षापासून इलेक्ट्रिक कार वापरत आहे. इलेक्ट्रिक कारचा मला चांगला अनुभव आला आहे. इलेक्ट्रिक कार एक यूनिटवर दहा किलोमिटरपर्यंत धावते. आता बरीच इलेक्ट्रिक वाहने येऊ लागली आहेत जी स्वस्त आणि चांगली आहेत.
अनेक राज्यांमध्ये ४०० पेक्षा जास्त बसेसची सुविधा करण्यात आली आहे, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंग स्टेशन तयार करणे फार महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे येत्या काळात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने धावतील असे देखील ते म्हणाले.