दैनिक स्थैर्य | दि. 22 डिसेंबर 2023 | फलटण | संत नामदेव महाराज यांचे तिर्थक्षेत्र असलेल्या पंजाब राज्यातील श्री क्षेत्र घुमाण येथे महाराष्ट्रातील यात्रेकरुंसाठी “महाराष्ट्र यात्री भुवन” बांधण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची ग्वाही पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी दिली.
संत नामदेव महाराज यांची ७५३ वी जयंती, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२७ वा संजिवन समाधी सोहळा व शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या ५५४ व्या जयंती निमित्त भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ व श्री नामदेव दरबार कमिटी घुमाण यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण ही सुमारे २१०० किलोमिटरची रथ व सायकल यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेचे स्वागत राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले होते. त्यावेळी भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी राज्यपाल पुरोहित यांच्याकडे महाराष्ट्रातील यात्रेकरुंसाठी श्री क्षेत्र घुमाण येथे “महाराष्ट्र यात्री भवन” बांधावे अशी मागणी केली.
राज्यपाल पुरोहित यांनी संत नामदेव महाराज यांच्यामुळे पंजाब व महाराष्ट्राचे संबंध अत्यंत चांगले असून संत नामदेव यांच्या विचार प्रभावामुळे पंजाब राज्यातील शिख बांधवांमध्ये त्यांच्या विषयी एक आदराचे स्थान निंर्माण झाले आहे. गुरु ग्रंथसाहेब मध्ये संत नामदेवांचे ६१ दोहे असून या संतांनी उत्तर भारतात भगवत भक्तीचा प्रचार व प्रसार केल्याने भारतीय संस्कृती ही जगात श्रेष्ठ मानली गेली असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील हजारो वारकरी हे संत नामदेवांच्या दर्शनासाठी पंजाबला येत असल्याने त्यांच्यासाठी आपण पंजाब सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र यात्री भवन बांधू असे ते म्हणाले आहेत.
यावेळी घुमाणचे सरपंच नरिन्द्र सिंह निंदी, अध्यक्ष तरसेम सिंह बावा, महासचिव सुखजिन्द्र सिंह बावा, उप सचिव मनजिन्द्र सिंह बावा, प्रैस सचिव सर्बजीत सिंह बावा, भागवत धर्म प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शंकर टेमघरे, सचिव ॲड. विलास काटे, खजिनदार मनोज मांढरे, विश्वस्थ सुभाष भांबुरे, राजेंद्रकृष्ण कापसे यांच्यासह सायकल यात्री उपस्थित होते.