केंद्र सरकारच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र ‘टॉप परफॉर्मर’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ जुलै २०२२ । मुंबई । केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीमधे स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्र ‘टॉप परफॉर्मर’ राज्य ठरले. या क्रमवारीवर आधारित २०२१ च्या आवृत्तीच्या निकालाची घोषणा आणि सत्कार समारंभ आज केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे झाला. राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंन्द्र सिंह कुशवाह यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

श्रीमती वर्मा म्हणाल्या की, आजचा पुरस्कार महाराष्ट्रातील संपूर्ण स्टार्टअप परिसंस्थेच्या प्रयत्नांचे फळ आहे, ज्यात राज्य सरकार, इनक्यूबेटर, एंजेल गुंतवणूकदार, शाळा आणि महाविद्यालये यांचा समावेश आहे. यापुढील काळातही राज्यातील स्टार्टअप परिसंस्थेच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येतील.

श्री. दीपेंन्द्र सिंह कुशवाह म्हणाले की, राज्याने स्टार्टअपसाठी कार्यक्रमाची आखणी आणि उद्दिष्टे ठरवून उत्तम यंत्रणा निर्माण करत केलेल्या प्रभावी कार्यासाठी हा बहुमान मिळाला आहे. नाविन्यपूर्ण दृष्टीकोण व प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आणि राज्यात नाविन्यपूर्ण उद्योगांसाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी नाविन्यता सोसायटी यापुढील काळातही विविध उपक्रम राबवेल, असे त्यांनी सांगितले.

२०१८ मध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्टार्टअपच्या परिसंस्था वाढीसाठी नियम सुलभ करण्याच्या दिशेने आणि स्टार्टअप परिसंस्थेला बळकट पाठिंबा देण्यास विविध निकषांच्या आधारावर स्टार्टअप रँकिंग हा उपक्रम सुरू करण्यात आला. २०२१ च्या आवृत्तीमध्ये ७ व्यापक सुधारणा क्षेत्रांचा विचार करण्यात आला ज्यामधे २६ कृती मुद्दे होते जे स्टार्टअप्स आणि परिसंस्थेच्या भागधारकांना नियामक तसेच धोरण आणि आर्थिक समर्थन प्रदान करण्यासाठी आवश्यक आहेत. या सुधारणा क्षेत्रांमध्ये संस्थात्मक समर्थन, नाविन्यता आणि उद्योजकतेला चालना देणे, बाजारपेठेत प्रवेश, इनक्युबेशन समर्थन, निधी समर्थन, मार्गदर्शन आणि क्षमता निर्मिती यांचा समावेश होता. महाराष्ट्र स्टार्टअप वीक, स्टार्टअप पोर्टल आणि महिला इनक्युबेशन सेंटर या प्रमुख उपक्रमांमुळे या क्रमवारीत महाराष्ट्राने ‘टॉप परफॉर्मर’ क्रमांक पटकवला. २०१८ च्या आवृत्तीत महाराष्ट्र हे उदयोन्मुख राज्य श्रेणीमध्ये होते तर २०१९ च्या आवृत्तीत नेतृत्व श्रेणीमध्ये होते.


Back to top button
Don`t copy text!