श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिनांक 24 जुलै ते 29 जुलै महाराष्ट्र सीनियर बॅडमिंटन स्पर्धेचे सातार्‍यात आयोजन


दैनिक स्थैर्य । 24 जुलै 2025 । सातारा । श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र सीनियर राज्य निवड बॅडमिंटन स्पर्धा 2025 याचे आयोजन दिनांक 24 जुलै ते 29 जुलै दरम्यान करण्यात आले असून, स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दिनांक 24 जुलै रोजी छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुल येथे आयोजित केला होता.

या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला छत्रपती वृषालीराजे यांच्या पुढाकारातून बर्‍याच कालावधीनंतर छत्रपती राजघराण्यातील परिवारांची एकत्रित उपस्थिती लाभली. अदालत राजवाड्याचा वारसाच मुळात सर्व राजपरिवाराला एकत्रित घेऊन पुढे जाण्याचा आहे. त्याच धर्तीवर या विशेष प्रसंगी श्रीमंत सौ. कुवराणी सत्वशीलाराजे सिंग (अक्का महाराज), श्रीमंत छत्रपती सौ. दमयंतीराजे भोसले, श्रीमंत छत्रपती विक्रमसिंहराजे भोसले, श्रीमंत छत्रपती सौ.वेदांतिकाराजे भोसले, सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षा श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोंसले आणि श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोंसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

छत्रपती घराण्याच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास राजेशाही गौरव लाभला. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजेंच्या स्मृतीस पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली. स्वर्गीय श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे हे बॅडमिंटन खेळाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असत. त्यांच्या योगदानामुळे आजच्या घडीला अनेक नामवंत खेळाडू उदयास आले. त्यामुळेच त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ असोसिएशनच्या अध्यक्षा श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोंसले यांच्या नेतृत्वात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 24 जुलै ते 29 जुलै 2025 पर्यंत ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेस जास्तीत जास्त सातारकरांनी क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवावे असे आवाहन वृषालीराजे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!