दैनिक स्थैर्य | दि. ०२ जानेवारी २०२५ | पुणे | महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत, शनिवारी आवाजी मतदानाने नवीन घटनादुरुस्ती मंजूर करण्यात आली. या सभेत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी या घटनादुरुस्तीचे महत्त्व स्पष्ट केले आणि ती इतर साहित्यिक संस्थांना आदर्श ठरेल असे प्रतिपादन केले.
या विशेष सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष व भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, उपाध्यक्ष राजीव बर्वे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, घटना समितीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ व सदस्य राजन लाखे यांची सन्माननीय उपस्थिती होती. सभेच्या प्रारंभी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सर्व सभागृहाने विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.
घटना दुरुस्ती समितीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी या नवीन घटनादुरुस्तीच्या मुख्य बाबी स्पष्ट केल्या. यात कार्याध्यक्ष पदाऐवजी अध्यक्षपद, सर्वच पदाधिकारी व कार्यकारी मंडळावरील जिल्हा प्रतिनिधी यांचेसाठी वय 75 ची मर्यादा, मराठी उत्तम पुस्तके अन्य भाषेत व अन्य भाषेतील उत्तम पुस्तके मराठीत आणण्यासाठी स्वतंत्र अनुवाद विभाग, स्वतंत्र निवडणूक मंडळ, मसाप कार्यक्रमात नव्या पिढीचा सहभाग असावा म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कार्यकारी मंडळात सहभाग, मसाप शाखांना भक्कम करण्यासाठी वाढीव अर्थसहाय्य (50 टक्के वर्गणीचा परतावा), अध्यक्ष, कोषाध्यक्ष, प्रमुख कार्यवाह यांची निवड आता फक्त पुण्यातूनच नव्हे तर सर्व आजीव सभासदांमधून, उपाध्यक्ष व विश्वस्तपदाच्या संख्येत वाढ, मसाप पत्रिकेचा दर्जा वाढवून वेबसाईटवरुन सर्वांना उपलब्ध, सर्व कायदेशीर आजीव सभासदांना सशुल्क ओळखपत्र इत्यादी सुधारणांचा समावेश आहे.
कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी या विशेष सभेच्या सूचनेचे वाचन केले व घटना दुरुस्ती हा एकच विषय चर्चेसाठी आहे असे सांगितले. त्यांनी तथाकथित महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण समितीच्या काही सदस्यांनी परिषदेच्या विरोधात जी पत्रके वितरित केली होती त्याचा परखड व स्पष्ट अशा सातारी भाषेत निषेध केला. काही पुण्यातले परिषद सभासद नसलेले व काही दोन – चार निष्क्रिय आजीव सभासद सतत वृत्तपत्रातून, समाजमाध्यमातून परिषदेचे गतिमान कामकाज व प्रगती न बघवल्यामुळे व्यक्तिद्वेषातून परिषदेची बदनामी करीत आहेत, याबाबतही विनोद कुलकर्णी यांनी सडेतोड विवेचन केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी या नवीन घटनादुरुस्तीचे महत्त्व स्पष्ट करताना ती इतर साहित्यिक संस्थांना आदर्श अशी ठरेल असे प्रतिपादन केले. त्यांनी सांगितले की ही ऐतिहासिक घटना मंजुरी म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विविध पदांचे व कार्यक्रमांचे विकेंद्रीकरण आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवीन घटनादुरुस्तीने संस्थेच्या भविष्यातील विकास व विकेंद्रीकरणाचा मार्ग मोकळा केला आहे. या दुरुस्तीच्या माध्यमातून परिषदेची कार्यक्षमता वाढेल व नव्या पिढीला अधिक सहभागी करून घेण्यात मदत होईल. 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये ही नवीन घटना लागू होईल, असे रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले.