उरल्यासुरल्यांच्या मोर्चालाही महाराष्ट्राने झिडकारले! – केशव उपाध्ये

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ डिसेंबर २०२२ । मुंबई । उभ्या महाराष्ट्रातील उरल्यासुरल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव करूनही महाविकास आघाडीला मुंबईत मैदानभर माणसेही गोळा करता आली नाहीत. उलट हिंदू दैवतांचा अपमान, संतांची कुचेष्टा करून समाजात धार्मिक तेढ पसरविणाऱ्या अपयशी महाविकास आघाडीला मोर्चे काढण्याचा अधिकारही नाही, अशी टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी केली आहे.

महाराष्ट्रद्रोहींना धडा शिकवायचा म्हणून काढलेल्या मोर्चात महाविकास आघाडीने महाराष्ट्रद्रोहींनाच सन्मानाने मंचावर बसविले हा या आघाडीचा सर्वात मोठा विनोद आहे, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. हिंदुत्वाचा गजर करत अंधारे बाईंसारख्या नेत्यांकडून कुराणातील अयाती वदवून घेणारे उद्धव ठाकरे यांच्या गटाची ताकद किती संपली हेच या मोर्चामुळे महाराष्ट्राला दिसले. काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच जमवाजमव करून सोबत घेतलेल्या सर्व पक्षांनी मिळून मोर्चा काढण्याचा गाजावाजा करूनही राज्यातील जनतेने मोर्चाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. निवडणुकीत जनतेने ज्या पक्षांना नाकारले, त्या पक्षांना खोट्या व दिशाभूल करणाऱ्या कारणासाठी रस्त्यावरही साथ द्यायची नाही हे राज्यातील जनतेने दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरे यांचा हिंदुद्वेष आता उघड झाला आहे. संतांचा, हिंदू देवदेवतांचा आणि स्वातंत्र्यवीरांचा अपमान करणारे व कुचेष्टा करणारे भाडोत्री नेते सोबत घेऊन उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या संत परंपरेची थट्टा उडवत आहेत. अशा नेत्याला जनता राज्यात थारा देत नाही हे लक्षात आल्यामुळेच जनाधार नसलेल्या पक्षांची जमवाजमव करून अस्तित्व टिकविण्याची केविलवाणी धडपड मोर्चामुळे उघड झाली, असे उपाध्ये म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सतत अपमान करणाऱ्या काँग्रेसचा आधार घेऊन संघटना बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ठाकरेंनी मागे वळून पाहिल्यास बाळासाहेबांच्या स्वाभिमानी सैनिकांनी पाठ फिरविल्याचे त्यांना दिसेल. पण अजूनही कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कमकुवत कुबड्यांवर त्यांचा भाबडा विश्वास असल्याने त्यांच्या गटाला कोणीच वाचवू शकणार नाही, असा सणसणीत टोलाही त्यांनी मारला.

संत, हिंदू दैवते, स्वातंत्र्यवीरांचा अपमान करणाऱ्या ठाकरे गटाच्या शिल्लक शिवसेनेविरोधातील असंतोष आज राज्यभर प्रकट झाला. राज्यात सुमारे सहाशेहून अधिक ठिकाणी भाजपतर्फे आयोजित माफी मांगो आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती उपाध्ये यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!