दैनिक स्थैर्य । दि. ०१ डिसेंबर २०२१ । मुंबई । वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागामार्फत 1 हजार 584 पदांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अ आणि ब वर्ग पदासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज दिली.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत वर्ग 1 ते वर्ग 4 या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून याबाबतची आढावा बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर, उपसचिव प्रकाश सुरवसे, अवर सचिव संतोष देशमुख, आयुषचे संचालक डॉ. कोहली यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले की, राज्यात अजूनही कोविडचा धोका टळलेला नसून शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयांमध्ये सतत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत ही मोठी पदभरती आहे. आतापर्यंत या विभागामार्फत एकूण 1 हजार 584 वर्ग अ आणि ब पदासाठीचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आले आहे. यापैकी 1 हजार 269 पदे वैद्यकीय शिक्षण कक्षाची आहेत. या पदांपैकी बहुतांश पदासाठी आयोगामार्फत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असून भरतीची प्रक्रिया सुरु आहे.
वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील रिक्त पदे सध्या 50 टक्क्यांपर्यंत भरण्याबाबतची मंजुरी मिळालेली आहे. तर वर्ग 4 मधील पदे वैद्यकीय शिक्षण विभागच्या अखत्यारित येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांना कंत्राटी पद्धतीने भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी याबाबत कार्यवाही करुन ही पदे तातडीने भरावी. तसेच वर्ग-3 संदर्भात मंजूर पदापैकी 50 टक्के पदे भरण्याची परवानगी राज्य शासनाची असल्याने याबाबतची जाहिरात कालबद्ध वेळेत प्रसिद्ध करुन या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी. वर्ग 1 ते वर्ग 4 ची पदभरती वेळेत झाल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येणार नाही. याशिवाय तदर्थ पदोन्नती, निम्न वेतनश्रेणीतील पदे उन्नत करण्यासाठी आवश्यकत त्या बाबी विभागीय निवड समितीसमोर मांडून वेळेत त्याबाबत निर्णय घेण्याला गती देण्यात यावी असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.